हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादर कबूतर खाना परिसर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. हा कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण तापलं आहे. जैन समाज तर पुरता आक्रमक झाला असून संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली . यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र जैन समाज कबुतरखान्यासाठी एवढा आक्रमक का झाला आहे? जैन समाजामध्ये कबुतरांना खायला घालणं एवढं महत्त्वाचं का मानलं जातं? जैन समाजात कबुतरांविषयी इतकी आपुलकी आणि महत्व का आहे? यामागे कोणतं कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जैन धर्मामध्ये कबुतराचे महत्त्व का आहे ?
धार्मिक मान्यतेनुसार, जैन समाजामध्ये सर्व जीवमात्रांप्रती करुणा आणि अहिंसा ही अत्यंत मूलभूत तत्त्वे मानली जातात. जैन संस्कृतीमध्ये मुक्या प्राण्यांना खाऊ घालणं हे पुण्याचे काम मानलं जातं. याच भावनेतून कबुतरांना दाणे खायला दिले जातात. जैन समाज कबुतरांप्रती विशेष प्रेम आणि आपुलकी दर्शवतो यामागेही काही कारणे आहेत.. कारण कबुतरे हे शांत, निरुपद्रवी आणि अहिंसक पक्षी मानले जातात. कबुतर हे मांसाहारी आहे, ते कोणत्याही इतर पक्षाचा जीव घेत नाही, त्यामुळे कबुतरे जैन समाजाला खूप प्रिय असतात. जैन धर्मामध्ये कबुतरांना दाणे टाकणे हे जीव दया म्हणजेच करुणेचं प्रतीक मानलं जातं.तसेच जैन धर्मीय लोक आपले धार्मिक कर्तव्य समजतात. जैन धर्मात जीव दयेच्या परंपरेला धार्मिक कर्तव्य मानलं जातं.
तसेच जैन धर्मात पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ति आणि पितृ-दोषातून मुक्तीसाठीही पक्षांना खायला टाकतात अशीही समाजात भावना आहे. विशेष म्हणजे कबुतराला अमावस्येच्या दिवशी दाणे टाकणं शुभ आणि फलदायक मानलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अमावस्येच्या दिवशी कबुतराला दाणे टाकतात. अध्यात्मिक दृष्टीकोन विचार केला तर कबुतरांना अध्यात्मिक संदेशवाहक मानलं जातं. त्यामुळेच कबुतरांना जास्त महत्त्व आहे. मुंबई शहरात काही जैन मंदिरांकडून आणि ट्रस्टच्या माध्यमातून ‘कबुतरखाने’ चालवले जातात. म्हणूनच दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय म्हणजे धार्मिक विश्वासांवर हल्ला असल्याचं मानत त्याला विरोध करत आहेत.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला?
बॉम्बे उच्च न्यायालयाच्या 31 जुलै 2025 च्या आदेशानुसार, कबुतरखान्यांमधील कबुतरांना खायला घालण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका आणि वारसा स्थळांचे नुकसान होत असल्याने, मुंबई महानगर पालिकेला कबुतरखाने बंद करण्याचे आणि दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता सरकारने हा निर्णय फिरवला आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.