औरंगाबाद प्रतिनिधी । आज महाराष्ट्रात वटपौर्णिमा सर्वत्र साजरी केली जात आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात व त्याला साकडे घालतात. मात्र सात जन्म सोडाच पण सात सेकंद आम्ही या बायकांसोबत राहू शकणार नाही. तेव्हा हे यमराजा आमच्या बायकांचे हे म्हणणे ऐकू नकोस म्हणत औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुषाश्रम ने पिंपळाची पूजा केली आहे. तसेच त्यांनी या निमित्ताने देशातील एकतर्फी विवाह कायदे बदलण्याची मागणी केली आहे. या आश्रमाचे अध्यक्ष भारत फुलारे व्हिडिओच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.
फुलारे म्हणाले, ‘आज आमच्या बायका सात जन्म हाच नवरा मिळावा अशी मागणी करतील पण आम्ही ७ सेकंद देखील या बायकांना सांभाळू शकणार नाही. कोरोनाचे संकट आज जगावर आले आहे, पण आम्ही ज्यादिवशी लग्न केले तेव्हापासून याहीपेक्षा महाभयंकर संकट आमच्यावर आले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्हाला कुणी साथ देत नाही आहे. त्यामुळेच आम्ही जी झुंज देत आहोत. त्यात मदत म्हणून जे एकतर्फी कायदे आहेत ते थांबले पाहिजेत. हिंदू विवाह कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. म्हणूनच विवाहसंस्था संपुष्टात येण्याआधी या एकतर्फी कायद्यांवर विचार करा.” फुलारे यांनी पिंपळ पूजा करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
पिंपळाला साकडे घालून त्यांनी हे यमराजा तू आमच्या बायकांचे अजिबात ऐकू नकोस, असे मागणे मागितले. कोरोना संकटाची जाणीव ठेवत त्यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही पूजा केली यावेळी त्यांनी शासनाला पुरुषांसाठी एखादा पुरुष अयोग्य स्थापन करण्याची विनंती केली आहे. पत्नी त्रासामुळे वैतागलेल्या पुरुषांना आत्महत्या न करता संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरवर्षी ते मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवत असतात. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे त्यांनी मोजक्या लोकांसमवेत सामाजिक अलगाव पाळत हा उपक्रम राबविला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.