सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
ग्रामपंचायत निकाला नंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे. आमदार शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेडीकल काॅलेजच्या जागेत दरोडा टाकला असुन सुमारे 1 कोटींच्या किमतीचे स्टील भंगारात विकल्याचा आरोप महेश शिंदे यांच नाव नं घेता शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
याबाबत कोणतही शासकीय डिपार्टमेंट याच्याबाबत पुढं येवुन तक्रार करत नाही. यामुळं याबाबत आता मी स्वत: तक्रार देणार आहे. पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही, तर मात्र मी कोर्टात सर्वाना खेचणार आहे. कुमठ्याची टाकी पाडण्यात आली याचं खुप मोठं राजकीय भांडवल करत गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, येवढ्या मोठ्या प्रकरणात साधी तक्रार सुद्धा केली गेली नाही. सदरची बाब आश्चर्याची असून कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे सुडबुद्धीचं राजकारण करत असल्याची टिका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
दरोडा 1 कोटीचा तरी तक्रार नाही नक्की कोणा- कोणाचा सहभाग?
शासकीय मेडिकल काॅलेजमध्ये जवळपास 1 कोटीचे स्टिल भंगारात लंपास झाल्यानंतर जबाबदार शासकीय यंत्रणेने तक्रार देणे गरजेचे आहे. परंतु आ. शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत या दरोड्याबाबत तक्रार दाखल नसेल तर हा दरोडा नियोजित असा आहे का असा सवाल उपस्थित केला जावू शकतो. तसेच नियोजित असेल तर नक्की या दरोड्यात कोणा- कोणाचा सहभाग आहे, हेही शोधणे गरजेचे आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यावर तक्रार न दिल्याने पहिल्यांदा निलंबन तसेच कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच अन्य सहभागी दरोडेखोरांचाही शोध घेणे गरजेचे आहे.