व्हॅट्सअप लवकरच डिजिटल पेमेंट ऍप लाँच करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बेंगळुरू । दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून चाचणी प्रक्रियेच्या टप्प्यावर असणाऱ्या व्हॉट्सअपच्या डिजिटल पेमेंट सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस ही सेवा सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. यूपीआय आधारित या सेवेच्या पहिल्या टप्प्यात केवळ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सिस बँकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंट व रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली होती. त्यानंतर यूपीआय आधारित अनेक पेमेंट सेवा सुरू झाल्या. देशभरात व्हॉट्सअपचे मोठ्या प्रमाणावर यूजर असल्याने या मंचानेही पेमेंट सेवा देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या संबंधित नियमांचे पालन करण्याची हमी व्हॉट्सअपकडून दिली न गेल्याने त्यास मंजुरी मिळाली नाही. मात्र, आता ही सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. तर, नंतरच्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचाही समावेश करण्यात येईल.

डेटाचे काय?
भारतातील डिजिटल पेमेंट व्यवहारातून निर्माण होणारा डेटा हा भारतातच जतन करायला हवा या आशयाच्या मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. व्हॉट्सअपचा या गोष्टीस विरोध असल्याने त्यांना अद्याप पेमेंट सेवेचा परवाना देण्यात आलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”