औरंगाबाद – डीजेच्या तालावर तरूणाई बेधुंद होऊन नाचायला लागली. मंडपात लवकर जाण्याच्या ओढीने नवरदेवही घोड्यावर स्वार झाले. तिकडे नवरीबाईही सजल्या-धजल्या, अन् अशात नवरदेव स्वार झालेल्या घोड्याच्या मागे कुणीतरी सुतळी बॉम्ब पेटविला. क्षणात धडाम् धूम आवाज झाला. तो ऐकून घोडा बिथरला अन् नवरदेवाला घेऊन सुसाट निघाला ! त्यांना शोधायला अख्खे वऱ्हाड धावले अन् गावकरीही सरसावले. शेवटी नवरदेवाला कापसाच्या शेतात टाकून घोडा कुठेतरी फरार झाला. नवरदेवाने प्रसंगावधान राखून आपण कापसाच्या शेतात पडलो असल्याचे लोकेशन मित्रांना पाठविले. अशा या गंमतीदार प्रसंगानंतर तब्बल दोन तास उशिराने हा लग्नसोहळा पार पडला ! याची चर्चा पंचक्रोशीत झाली.
कोरोनाचे संकट गडद असले तरी सध्या लग्नसराई जोरात सुरु आहे. यात लग्नातील किस्सेही पहायला, ऐकायला मिळत आहेत. असाच एक किस्सा रविवारी औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबेजळगाव (ता. गंगापूर) परिसरातील एका खेड्यात घडला. लग्न गावखेड्यातील असले तरी नियोजित वेळेत नवरदेव लग्नस्थळी पोचला. आल्यावर त्याचे वधुपित्याकडून जोरदार स्वागत झाले. प्रथेप्रमाणे चहापानानंतर नवरदेवाचे वरपूजन आधी हनुमान मंदिरात झाले. त्यानंतर नवरदेवाचे परत एकदा पूजन करुन नवरदेव घोड्यावर स्वार झाला. आता लग्नघटिका जवळ येत होती. तसतशी लग्नस्थळी गर्दी होऊ लागली. मंडपात येत असताना डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचायला लागली. तेवढ्यात नवरदेव स्वार असलेल्या घोड्याच्या पाठीमागे एकाने मोठ्ठा फटाका पेटविला. कानठळ्या बसविणारा जोरदार आवाज झाला. हा आवाज कानी पडताच घोडा बिथरला आणि नवरदेवाला घेऊन पळत सुटला. हा हा म्हणता घोडा पुढे अन् अख्खे वऱ्हाड त्याच्या मागे…! असा पाठलाग सुरू झाला.
नातेवाईक, मित्रपरिवार, पाहुणे कुणी पायी तर कुणी वाहने घेऊन नवरदेव अन् घोड्यामागे लागले. तोपर्यंत घोडा नवरदेवाला घेऊन बराच लांब गेल्याचे दिसून आले. पाहुण्यांनी बरीच शोधाशोध केली, मात्र तरीही नवरदेव सापडत असल्याने नवरीसह वऱ्हाडी मंडळी चिंतेत होती. तिकडे घोड्याने नवरदेवाला दूरवरील कापसाच्या शेतात टाकून पोबारा केला. लंगडत लंगडतच नवरदेव शेतातून बाहेर आला. सुदैवाने कापसाच्या शेतात काही महिला होत्या. त्यातील एका महिलेचा मोबाईल घेऊन नवरदेवाने आपल्या नातेवाईकांना लोकेशन पाठविले. लगोलग काहीजण तिथे पोचले. नवरदेवाला घेऊन ते थेट मंडपाच्या स्टेजवर आले. या प्रकारात नवरदेवाला किरकोळ मुका मार लागल्याचे दिसून आले. त्यामुळे नवरदेव लंगडत असल्याने गेटवर न आणता थेट स्टेजवर नेण्यात आले. नंतर नवरीला वाजतगाजत स्टेजवर आणण्यात आले आणि सर्वांच्या लक्षात राहणारा हा लग्नसोहळा अखेर पार पडला. या सगळ्या गदारोळात घोडा कुठे निघून गेला कोण जाणे!