आष्टी : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटकाळात महिलांपेक्षा पुरुषांचा अधिक छळ झाल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी जाहीर केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक पुरुषांना पत्नीच्या मानसिक छळाचा सामना करावा लागला. अशीच एक घटना आष्टी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब दे म्हणून एका महिलेने आपल्या पतीचा छळ केला आहे. तसेच आई वडिलांना पगाराचे पैसे का दिले? असा जाब विचारत मारहाणदेखील केली आहे. यामुळे पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अनिल आबासाहेब जगताप असे आहे. ते वनरक्षक पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पत्नीने पतीला त्रास द्यायला सुरुवात केली होती. तसेच तिने लग्नापूर्वीचा पगार काय केला? याचा हिशोब दे म्हणून पतीकडे तगादा लावला होता. एवढेच नाहीतर पगाराचे पैसे आई वडिलांकडे का दिले म्हणून पतीला मारहाणसुद्धा केली.
आरोपी पत्नी एवढ्यावरच थांबली नाही, तर शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पतीचा छळ करू लागली. पत्नीकडून सतत होत असलेल्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याच्या एक महिन्यानंतर पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक केली नाही आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.