हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या लाठीचारावर संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर विरोधक देखील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. मात्र या सगळ्यात सत्ताधाऱ्यांवर तोफ झाडणाऱ्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच सरकारने मराठा आरक्षणाबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आंदोलनासाठी जमीन विकली
जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीमारामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. माथोरी हे त्यांचे मूळ गाव तर शहागड ही त्यांची सासुरवाडी आहे. ते गेल्या १२ -१५ वर्षांपासून शहागडमध्ये स्थित आहेत. मनोज हे नेहमीच मराठा आंदोलनात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले गेले आहेत. 2015 पासून मनोज पाटील हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन सरकारला जाब विचारत आंदोलन करत आपले प्रश्न मांडताना दिसले आहेत. त्यांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले असले तरी ते नेहमी सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी मराठा आंदोलनासाठी आपली जमीन देखील विकून टाकली आहे.
इतकेच नव्हे तर मनोज जरांगे यांनी शिवबा या संघटनेची स्थापना केली आहे. सध्या त्यांचे “जगलो तर तुझा, अन्यथा कपाळावरचे कुंकू पूस असे सांगून आलो आहे” हे वाक्य जास्त चर्चेत आले आहे. गेल्या मधल्या काळात मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारा भाव, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे प्रश्न अशा अनेक कारणांवरून सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यांच्या या आंदोलनामुळेच त्यांना पाठिंबा देणारा एक वर्ग जमा झाला आहे. आता ते मराठा आरक्षण आंदोलनासाठी मैदानात उतरले आहेत. लोकांकडून त्यांना तितकाच प्रतिसाद देखील दिला जात आहे.
उद्धव ठाकरेंकडून दखल..
यापूर्वी त्यांनी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे आंदोलन पुकारले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी थेट मुंबईला बोलावून घेतले होते. त्यांनी घेतलेल्या ठोस भूमिकांमुळे सरकारला देखील त्यांची दखल घ्यावी लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते होण्यापूर्वी मनोज पाटील हे एका हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांचे पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असे कुटूंब आहे. आता मनोज जरांगे पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात.
मराठा आदोंलनात आमरण उपोषण
दरम्यान, गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. सरकारने त्यांची दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढावा यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. परंतु गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या शांत आंदोलनात शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर देखील मनोज पाटील यांनी हे आंदोलन मागे घेतलेले नाही. त्यांच्या आंदोलनाला आता आणखीन बळ मिळालं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.