कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील
आपण यशस्वी लोकांचे यश पाहतो. मात्र, त्यामागील प्रयत्न, कष्ट आपण पाहिले पाहिजेत. मोठे ध्येय अंगी बाळगा, मनाची स्थिरता आवश्यक बाब आहे. अभ्यास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या सवयी अंगी बाळगाव्यात. त्याच यशापर्यंत पोहोचवितात, असे मत आसाममध्ये कार्यरत असलेले धडाकेबाज आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी व्यक्त केले. सद्गुरू श्री वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशन, मुंबई, शाखा कराड तर्फे शनिवारी सकाळी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) कराड येथे आयोजित केलेल्या ‘मी यशस्वी होणारच’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
आयपीएस निंबाळकर सर म्हणाले, यशाचे रहस्य खुले आहे. जे स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करतात, ते यशस्वी होतात. अशी सद्गुरू वामनराव पै यांची शिकवण मी स्वीकारली आणि मी यशस्वी होत गेलो. अपयशाने खचून जाऊन अनेकजण आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात. या मुलांनी असा मार्ग अवलंबण्यापूर्वी संघर्ष कुणाला चुकलाय का, हे पाहावे. त्यामुळे आत्महत्या पर्याय नसतो. अपयशातून यश मिळवण्याचे ध्येय अंगी बाळगले पाहिजे. त्याकरता आपल्यातील क्षमता ओळखायला शिकलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात टॉप जाणे ही सुद्धा राष्ट्रसेवाच असते. कारण राष्ट्रातील लोक टॉप ला गेले तरच राष्ट्र टॉपला जातं. त्यामुळे आपली प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची व विश्वशांतीच्या दिशेने असली पाहिजे. मोठी ध्येय बाळगली पाहिजेत. मनाची स्थिरता आवश्यक बाब आहे. अपयश आल्यानंतर स्वतःकडे प्लॅन बी तयार हवा. अभ्यास करताना वाचलेले कागदावर उतरायला यायला पाहिजे. जीवनविद्या मिशनमधील ‘थ्री आर अभ्यास फॉर्म्युला’ वापरून यश मिळवता येते. दहा तास अभ्यास, आठ तास झोप आणि सहा तास इतर कामांना वेळ द्या. असे नियोजन असेल तर यश हमखास आपल्या आवाक्यात येईल.
या कार्यक्रमानिमित्त आयपीएस वैभव निंबाळकर सर यांची “डीआयजी” पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जीवनविद्या मिशन कराड शाखेतर्फे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचे प्राचार्य श्री. रमाकांत श्रीवास्तव सर यांच्या हस्ते करण्यात आला. तर वडील चंद्रकांत निंबाळकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. त्यावेळी व्यासपीठावर जीवनविद्या फाउंडेशनचे अध्यक्ष मा.दिलीप महाजन सर व हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभलं ते या कार्यक्रमाचे प्रायोजक – ओएसिस सायंटिफिक टेक्नॉलॉजी कंपनीचे सीइओ श्री शिवराज पाटील उपस्थित होते. तसेच या वर्षी एमपीएससी तून एसटीआय पदी निवड झालेल्या कराड शाखेच्या युवा नामधारीका स्नेहल पाटील व मयुरी देशमाने यांचाही सत्कार आयपीएस वैभव निंबाळकर सर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला कराड व पंचक्रोशीतील युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोर विचारवंत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या शिकवणीमुळे तरलो…
आसाममध्ये कर्तव्यावर असताना झालेल्या गोळीबारात मांडीत गोळी लागली आणि हाड मोडल्याचा आवाज आला. अशा गंभीर अवस्थेतही जवानांच्या रेस्क्यू करण्यासाठी वरिष्ठांना फोन केला. त्या 45 मिनिटांमध्ये सद्गुरु श्री. वामनराव पै यांची सकारात्मक विचार करण्याची शिकवण मला कामी आल्याची आठवण त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली. येथे कार्यरत असताना काझीरंगा येथील गेंड्यांची तस्करी, ड्रग्ज, महिला अत्याचार, नक्षलवाद अनुभवही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्यावरील नक्षल्यांचा हल्ला व उपचारादरम्यानची चित्रफीतही पाहून उपस्थित भारावले.
आयपीएस वैभव निंबाळकर कोण…?
#आयपीएस वैभव निंबाळकर हे सध्या “डीआयजी” या पदावर आसाम येथे कार्यरत आहेत.
# त्यांनी वयाच्या “22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी” मध्ये यश मिळवले. भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक.
# एक उत्कृष्ट आयपीएस ऑफिसर म्हणून अनेक धडाकेबाज मोहीम त्यांनी राबवल्या.
# 26 जुलै 2021 रोजी झालेल्या आसाम मिझोराम सीमा संघर्षामध्ये पायाला गोळी लागून गंभीर जखमी. या संपूर्ण परिस्थितीमध्ये असामान्य, अतुलनीय असं शौर्य त्यांनी दाखवलं.
# त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारकडून ‘पराक्रम पदकाने’ सन्मानित.
दि.26 रोजी युवा कोर्सचे आयोजन…
आजची तरुण पिढी ही राष्ट्राचे उद्याचे भविष्य आहे आणि आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जायचं असेल, तर तरुण पिढी घडली पाहिजे हा संकल्प ऊराशी बाळगून जीवनविद्या मिशन तरुणांना घडवण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असते. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे “तरुणांनो करा सोने आयुष्याचे” हा युवा कोर्स.
या कोर्समध्ये “करियर, प्रेमाचं गोड गुपित, शुभमंगल सावधान आणि सावध तो सुखी” या चार सत्रांमध्ये तरूणांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कोर्स रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत वेणूताई चव्हाण सभागृह कराड येथे आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त युवांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या आयुष्याचे सोने करावे असे आवाहनही आयपीएस निंबाळकर यांनी केले.