काबूल । अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने नवीन सरकारची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे प्रमुख मुल्ला बरादर हे नव्या सरकारचे प्रमुख असतील. तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादाला अफगाणिस्तानचा सुप्रीम लीडर बनवले जाईल.
अल-अरेबिया न्यूजच्या बातमीनुसार, तालिबानचा संस्थापक दिवंगत मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब आणि शेर मोहम्मद अब्बास स्टेनिकझाई हे सरकारमध्ये वरिष्ठ पदांवर राहतील.
मुल्ला अब्दुल गनी बरादर हे त्या चार लोकांपैकी एक आहेत ज्यांनी 1994 मध्ये तालिबानची स्थापना केली. सन 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानात सैन्याने कारवाया सुरू केल्या तेव्हा मुल्ला बरादर यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्याचे वृत्त आले. अमेरिकन सैन्याने त्याला अफगाणिस्तानात शोधायला सुरुवात केली, मात्र तो पाकिस्तानात पळून गेला होता.
2010 मध्ये बरादरला आयएसआयने कराचीतून अटक केली होती. अमेरिकेच्या विनंतीनुसार 2018 मध्ये त्याला सोडण्यात आले. सध्या, बरादर हा तालिबानचा राजकीय प्रमुख आणि गटाचा सार्वजनिक चेहरा आहे. बरदार 1980 च्या दशकात सोव्हिएत सैन्याविरुद्ध अफगाण मुजाहिद्दीन सोबत लढला. 1992 मध्ये रशिया बाहेर पडल्यानंतर प्रतिस्पर्धी सरदारांमध्ये गृहयुद्ध भडकले. त्या वेळी बरादरने त्याचा माजी कमांडर आणि नातेवाईक मोहम्मद उमर याच्यासह कंदहारमध्ये मदरसा स्थापन केला होता.
90 च्या दशकात जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची स्थापना झाली. त्यावेळी त्याचा प्रमुख मुल्ला मोहम्मद उमर होता. असे म्हटले जाते की, बरादरची बहीण ही मुल्ला ओमरची बायको होती. 90 च्या दशकातील कुख्यात तालिबान राजवटीतील तो दुसरा प्रमुख नेता होता. जिल्हा आणि प्रांतीय राजधानींवर विजय मिळवण्यासाठी बरादर याला मुख्य जबाबदार मानले जाते.
तालिबानचे अनेक मोठे नेतेही अखुंदजादाला पाहू शकत नाही
त्याचबरोबर हैबतुल्लाह अखुंदजादाला देशाचा सुप्रीम लीडर बनवला जाईल. तो असा दहशतवादी आहे, ज्याला त्याच्या स्वतःच्याच संस्थेचे फार कमी लोकं पाहू शकतात. तालिबानच्या अनेक बड्या नेत्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहित नाही. तो दैनंदिन जीवनात काय करत आहे हे देखील तालिबान लढाऊंना माहीत नाही. मात्र, तो इस्लामिक सणांवर व्हिडिओ संदेशांद्वारे दहशतवाद्यांना मेसेज पाठवतो.