हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले तीन चार महिने जगाला कोरोना महामारीने अक्षरशः हैराण केले आहे. विविध पातळीवर शास्त्रज्ञ या विषाणूची लस शोधण्याचा तसेच यावर औषधोपचार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता ‘आपण करोनाला हरवू शकत नाही असे विधान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केले आहे. यामुळे पुन्हा निराशा झाली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हा इशारा दिला आहे. करोना काळातून सावरण्यासाठी आता अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशात WHO च्या महासंचालकांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
यावेळी त्यांनी, करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही बोलून दाखवली आहे. दुबई मध्ये एका हेल्थ फोरममध्ये ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. WHO ने गेल्याच आठवड्यात करोना व्हायरसची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा दिला होता. एकीकडे संसर्ग वाढतो आहे आणि दुसरीकडे संचारबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्था ढासळत आहेत. जगभरात लाखो लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. अमेरिका, आशिया खंडातल्या काही भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यूरोपमध्ये प्रतिबंधात्मक उपायही सुरु करण्यात आले आहेत. तर या विधानामुळे आता जगाला पुन्हा भीती वाटू लागली आहे.
COVID 19 मुळे आतापर्यंत जगभरात ४ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूच्या अटकावासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे आर्थिक नुकसानीस बळी पडावे लागते आहे. सद्यस्थितीत जगभरात हा रोग पसरतो आहे. संपूर्ण जगावर एक मोठं संकट या साथीच्या आजारामुळे उभे राहिले आहे.