नवी दिल्ली । मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. यावेळी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. जडेजाने 228 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने 228 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर शनिवारी जडेजाने वर्चस्व गाजवले. रविचंद्रन अश्विनने 82 चेंडूत 62 धावांची खेळी केली तर शमी 20 धावा करून नाबाद राहिला. जडेजा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे तो कारकिर्दीतील आपले पहिले द्विशतक सहज झळकावेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही.
जडेजा हळूहळू द्विशतकाकडे वाटचाल करत असताना कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. यानंतर टी ब्रेकही घेण्यात आला. रोहितच्या डाव घोषित करण्याबाबत लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर चाहते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. जडेजाकडे द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, मात्र प्रशिक्षक आणि कर्णधाराने ती पूर्ण होऊ दिली नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
युझर्सना यावेळी 2004 चा दौरा आठवला आहे, जेव्हा टीम इंडिया द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी मुलतान कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर 194 धावांवर फलंदाजी करत असताना द्रविडने डाव घोषित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. द्रविड त्यावेळी कर्णधार होता आणि आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. युझरने लिहिले की, ‘रवींद्र जडेजाच्या जागी रोहित किंवा विराट कोहली असते तर असा डाव घोषित केला असता का???’ दुसऱ्या युझरने लिहिले, ‘मी राहुल द्रविडवर पूर्णपणे बहिष्कार टाकते, हे अन्यायकारक आहे. रवींद्र जडेजा द्विशतकाला पात्र होता.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 400 बळी घेणारा जडेजा हा भारताचा दुसरा क्रिकेटर आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी भारतासाठी 356 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9031 धावा निघाल्या. याशिवाय कपिलने 687 विकेट्स घेतल्या आहेत.