हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्मा कडे आहे. येत्या 2023 आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. परंतु रोहितचे वय आत्ता 36 आहे, अशावेळी त्याच्यानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहितनंतर हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाची धुरा जाईल अशा चर्चा कायमच सुरू असतात. परंतु माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मात्र पुढील भारतीय कर्णधारपदासाठी 2 वेगळ्याच खेळाडूंची नाव सांगितली आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, माझ्या मते रोहित शर्मा नंतर युवा सलामीवीर शुभमन गिल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हे दोघे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन बनू शकतात. याशिवाय जर तिसरा कोणी खेळाडू असेल तर तो ईशान किशन आहे…. अक्षर पटेलचा खेळ गेल्या काही महिन्यांपासून अजून छान होतोय, अशावेळी त्याला उपकॅप्टन बनवलं पाहिजे, जेणेकरून तो कर्णधारपदासाठी स्वतःला आणखी तयार करेल. शुभमन गिल आणि ईशान किशन हे सुद्धा कर्णधारपदासाठी योग्य आहेत, पण त्यासाठी त्यांना आधी संघातील जागा कायम ठेवावी लागेल असेही गावस्कर म्हणाले.
दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी 2 कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी अजिंक्य रहाणेला उपकर्णधार केल्याने गावस्कर यांनी यापूर्वीच संताप व्यक्त केला आहे. अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधार पद सोपवण्यात काहीही चुकीचे नाही, परंतु त्याऐवजी एक नव्या दमाचा युवा खेळाडू आपण तयार करू शकलो असतो अस गावस्कर यांनी म्हंटल.