नवी दिल्ली वृत्तसंस्था: महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले . राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे आता गुजरात कॉंग्रेस प्रभारी पदी कोणाची निवड नेमणूक होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातव यांच्या निधनामुळे दोन पदे रिकामी झाली आहेत. राज्यसभेतील सदस्यत्व आणि गुजरात मधील काँग्रेस प्रभारी पद . दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी दोन जणांच्या नावावर सध्या विचार केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमधील दोन नावांची विशेष चर्चा आहे.
गुजरात मध्ये नवीन कॉंग्रेस प्रभारी कोण असेल या विषयी काँग्रेस पक्षात उच्चस्तरीय बैठका सुरू असल्याची माहिती आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत या तिघांनी मिळून काही नावं काढले असल्याचे आता सांगण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक आणि माजी महासचिव अविनाश पांडे या दोघांची नावं जास्त चर्चेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी मुकुल वासनिक या नावाच्या बाजूने आहेत तर राहुल गांधी अविनाश पांडे यांच्या नावाला पसंती देत आहेत. पांडेजी सोनिया गांधींच्या विश्वासातले असल्याचा मानलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे राजस्थान काँग्रेसच्या प्रभारी पदी असताना त्यांनी सचिन पायलट यांची पक्षातील दगाबाजी खेळी हाणून पाडण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. याच कारणामुळे अशोक गहलोत यांचादेखील अविनाश पांडे यांना पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे.