हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला (Ashok Chavan Joined BJP) . मी पक्षात शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं, मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेस सोडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पण दोन वेळा मुख्यमंत्रीपद, काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मंत्रीपदे देऊनही अशोक चव्हाण भाजपात का गेले असावेत, असाही प्रश्न अनेकांना पडला. संसदेत काँग्रेस काळातील भ्रष्ट्राचारासंदर्भात काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आल्याने त्यांनी भाजपात प्रवेशाचा मार्ग पत्करला असावा, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण त्याआधी अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवासही जाणून घ्यायला हवा.
महाराष्ट्राच्या राजकारणात अशोक चव्हाण हे मोठ प्रस्थ. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या जवळचे व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांची राजकीय कारकिर्दी तशीच गाजली होती. तरुण वयातच अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम सुरू केले. १९८६ ते १९९९ या काळात अशोक चव्हाण महाराष्ट्र काँग्रेसचे युवा सरचिटणीस आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडे बंदर विकास, परिवहन, राजशिष्टाचार आणि सांस्कृतिक खाते देण्यात आले. अशोक चव्हाण यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत नांदेडमधील मुदखेड विधानसभा मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले.
२००८ मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे राज्यात काँग्रेसविरोधी वातावरण तयार झालं होतं. विलासराव देशमुख यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात आला. त्याचवेळी काँग्रेसमध्ये पतंगराव कदम आणि नारायण राणे यांच्यासारखी मंडळीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. पण खासदार राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला आणि ते महाराष्ट्राचे चोविसावे मुख्यमंत्री झाले.
मुख्यंमत्रीपदाची जबाबदारी पार पाडताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेससाठी पुन्हा वातावरण तयार केलं. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून दिला आणि अशोक चव्हाण यांची दुसरी टर्म सुरू झाली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यामंध्ये शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या एकमेव बापलेकांची जोडीच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली दिसते. याचं कारण म्हणजे गांधी कुटुंबियांवर दाखवलेली निष्ठा. या निष्ठेतूनच राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिलं असावं, असे जाणकार सांगतात.
अशोक चव्हाण यांच्या सरकारला अवघे १० -११ महिने झाले होते. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामुळेही ते चांगलेच चर्चेत राहिले. या काळात त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा खटला मुंबईत चालवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण माहिती तंत्रज्ञान सेवा धोरण, पुण्यात गुप्तचर प्रशिक्षण केंद्राची उभारणी, सहावा वेतन आयोग लागून करुन त्यासाठी अकरा हजार कोटींची तरतुद, झोपडपट्टी वासियांना २६९ चौरस फुटांची घरे देणे, यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले.