बालदिन का साजरा करतात? काय आहे यामागील इतिहास? चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज 14 नोव्हेंबर…. आजचा दिवस सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती… पंडित नेहरू हे लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1856 रोजी इंग्लंडमध्ये जगात पहिल्यांदा चेल्सी इथे बालदिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू सर्व देशांमध्ये वर्षातील एक दिवस बालदिन म्हणून त्यांच्या सोईनुसार साजरा करण्यास सुरुवात झाली. 1954 रोजी संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेऊन 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. आता सर्व देशांमध्ये 20 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. 1954 ते 1964 रोजी भारतातही 20 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जात होता.

1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर मात्र भारतातील बालदिनाची तारीख बदलण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली म्हणून 14 नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. 27 मे 1964 रोजी याबाबत भारतात सर्वानुमते अधिकृत घोषणा करण्यात आली.

पंडित नेहरूंनी भारतातील मुलांचे तसेच तरुणांचे शिक्षण, प्रगती, कल्याण आणि विकासासाठी खूप काम केले होते. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

बालदिवसाच्या निमित्ताने देशभरात शाळांमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येतात. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.

You might also like