हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज सर्वच स्तरात महिला आघाडीवर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात असो, वा नोकरीच्या ठिकाणी महिला पुरुषांच्या बरोबरीने खंबीरपणे उभ्या आहेत. जगातील प्रत्येक स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. परंतु, तुम्हांला माहीत आहे का? की यामागील नेमका इतिहास काय आहे आणि पहिल्यांदा महिला दिन केव्हा साजरा केला नाही ना? चला आज आपण यामागील इतिहास जाणून घेऊया…
महिला दिनाची बीजे रोवली गेली ती म्हणजे अमेरिकेत त्यावेळी संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध 8 मार्च 1908 साली 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला होता. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या काही मागण्या होत्या. महिलांची ही कामगार चळवळ लक्ष्यात घेऊन त्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर अमेरिकेतील सोशालिस्ट पार्टीने पहिला महिला दिन घोषित केला. तो मोर्चा 8 मार्च रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर महिला दिनाची सुरूवात झाली.
त्यानंतर 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. 2011 साली महिला दिनाला 100 वर्ष पूर्ण झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषत: जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करतो आणि लैंगिक असमानतेबद्दल जागरुकता वाढवतो तसेच महिलांच्या बद्दल कौतुक, आदर आणि प्रेम दर्शवतो. महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळच्या महिलांना शुभेच्छा तसेच भेटवस्तू देऊ शकता आणि महिलांप्रती तुमचा आदर व्यक्त करू शकता