मोदींना पवार- ठाकरे का हवेत? सामनातून मोठा उलगडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा त्यांनी NDA मध्ये यावं असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं होते. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकजण संभ्रमात पडले. एकीकडे पवार ठाकरेंवर मोदी सडकून टीका करत असताना दुसरीकडे आमच्याकडे या अशी साद ते का घालत असावेत असा प्रहन राजकीय विश्लेषकांना सुद्धा पडला. मात्र आता सामना अग्रलेखातून मोदींच्या या आवाहनावर थेट भाष्य करण्यात आलं आहे. मोदी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आहेत. त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची मदत लागणार आहे असं सामना अग्रलेखातून म्हंटल आहे .

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

नरेंद्र मोदी हे नितीश कुमार यांच्याप्रमाणेच आजारी असून भारतीय जनता पक्षाने त्यांना फार दगदग करू देऊ नये. देशासाठी नसले तरी भाजपसाठी मोदी महत्त्वाचे आहेत. दुसरे असे की, काँग्रेस पक्षात मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोदा वगैरे लोक जे बोलतात त्याचा फायदा भाजपास होतो. आजारपणामुळे मोदी त्याच रांगेत जाऊन बसले. मोदी यांची भाषणे व वक्तव्ये यामुळे भाजपचीच कोंडी होताना दिसत आहे. मोदी यांची प्रकृती बरी नसल्याचे हे लक्षण आहे. मोदी हे नंदुरबार येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले. तेथे त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आमच्या बरोबर यावे हे त्यांचे विधान हास्यास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते. महाराष्ट्रात आपल्याविरुद्ध वातावरण आहे हे त्यांनी जाणले आहे. मोदी यांनी प्रत्येक भाषणात ‘ठाकरे पवार’ यांच्यावर जहरी टीका केली. हे दोन्ही नेते व त्यांचे पक्ष नकली आहेत, उद्धव ठाकरे हे तर नकली संतान असल्याची गरळ त्यांनी ओकली. मग हे नकली लोक मोदींना त्यांच्या सोबत 4 जूननंतर का हवे आहेत? हा भाजपच्याच मंडळींना पडलेला प्रश्न आहे.

“एक अकेला सब पर भारी” असे मोदी स्वतःच स्वतःविषयी सांगतात. एकट्याच्या बळावर आपण लोकसभेच्या चारशेपार जागा जिंकू अशा वल्गना मोदी यांनी आधीच केल्या आहेत. एकनाथ शिदि, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखे पोकळ बांबू त्यांनी ‘टेकू’ म्हणून भाजपला लावले. शिंदे, अजित पवार वगैरे लोक हे महाबली असल्याचे त्यांनी जाहीर केले. मग तरीदेखील उद्धव ठाकरे, शरद पवार त्यांना का हवे आहेत? याचे उत्तर एका वाक्यात सांगायचे तर मोदी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आहेत. त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांची मदत त्यांना लागणार. त्यामुळे आतापासून मोदी यांनी लाडीगोडीचे डाव टाकायला सुरुवात केली आहे.

माणूस आधी मनाने हरतो व मग रणांगणात हरतो. मोदी हे मनाने पराभूत झाल्याचे स्पष्ट दिसते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेस यांची आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे व महाराष्ट्राचा मतदार मोदींना धडा शिकवण्याच्या भूमिकेत आहे. ‘मोदी मॅजिक’, ‘मोदींची जादू’, ‘मोदी है तो मुमकीन है’ वगैरे प्रयोग यावेळी कोसळले आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात जे उटपटांग डाव टाकले ते त्यांच्यावरच उलटले आहेत. मोदी-शहा जोडीस भयाने ग्रासले आहे व त्यातूनच त्यांना काही नवे विकार जडले असावेत. मोदी हे ताळतंत्र सोडून बोलत आहेत. मोदी यांचे राजकीय आकलन व अनुभव वेगळाच आहे. त्यामुळे शरद पवार यांनी कांग्रेस व इतर पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात नक्की काय सांगितले ते मोदी यांच्या डोक्यात धड गेले नाही. असेही सामनातून म्हंटल आहे.