कोल्हापूर | कोल्हापूरात चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी मूळ खदखद कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या बंडखोर शिंदे गटात सामील असलेले राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच विरोध होता, हे आता समोर आले आहे.
शिवसेनेतील फूटीनंतर एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र गट स्थापन झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेला मोठी खिंडार पडली. कोल्हापूरचे विद्यमान दोन खासदार आणि दोन आमदार यांच्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाला जावून मिळाले. यावेळी आपण हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजप सोबत गेलो असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता माजी आ. राजेश क्षीरसागर यांची खरी मनातील खदखद बाहेर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आ. प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सुध्दा बंडाळी करत शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांची बंडखोरी आणि निष्ठावंत शिवसैनिक असे आमनेसामने आलेले आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दाैरा असताना याचदिवशी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असल्याचे कोल्हापूरात पहायला मिळत आहे. अशावेळी ज्या मुद्यांवरून बंडखोरी केल्याचे सांगितले जात होते, त्यामध्ये आता राजेश क्षीरसागर यांचा आता नवा मुद्दा समोर आला आहे. यामध्ये त्यांनी आपली राज्यसभेला उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न जाहीरपणे विचारला आहे.