साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने एका विधवा शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून आरोपी गटशिक्षणाधिकारी तिच्या मागावर होता. आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्याने अनेकदा पीडितेवर अश्लील शेरेबाजीसुद्धा केली आहे. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी देखील केली आहे. या प्रकरणी पीडित शिक्षिकेने आयुक्तांकडे लेखी तक्रारसुद्धा केली होती. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशाखा समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पीडित महिला शिक्षिका हि सातारा तालुक्यातील एका शाळेत उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे. या शिक्षिकेने आयुक्‍तांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हि पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून गटशिक्षणाधिकार्‍याने तिला त्रास द्यायला सुरू केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. याबरोबर आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्याने पंचायत समितीमध्ये बोलावून कौटुंबीक पार्श्‍वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. याशिवाय पीडित शिक्षिकेच्या पतीचे निधन झालेले असताना तुमचे मिस्टर कुठे असतात, तुमची बदली करू का, कोंढवलीला जाता का? चिंचणेरला येता का? असे विविध प्रश्‍न विचारून गटशिक्षणाधिकार्‍यांनी मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोपदेखील तिने आपल्या तक्रारीत केला आहे.

31 जानेवारी 2020 रोजी मुख्याध्यापक कामानिमित्त बाहेर गेले असताना दुपारी आरोपीने अचानक शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांची चौकशी करायची सोडून पीडितेवर अश्लील शेरेबाजी केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आरोपी गटशिक्षणाधिकारी 10 आणि 17 जून 2020 रोजी दोन वेळा पीडितेच्या घरी गेला होता. तसेच त्याने घरात खेळणाऱ्या पीडितेच्या मुलीला घराबाहेर पाठवून शरीरसुखाची मागणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच कोरोना काळात वर्गातील मुलांची तपासणी घेवून शैक्षणिक कामाबाबत नाचक्की करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. तसेच पीडितेने शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार अर्जसुद्धा दिला आहे.

Leave a Comment