सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
विवाहानंतर घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या नवविवाहितेला पतीनेच मित्राच्या सहाय्याने इस्लामपूर न्यायालय परिसरातून अपहरण केल्याची घटना आज सकाळी घडली. दिवसा ढवळया पतीकडून पत्नीचे अपहरण झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. कासेगाव येथील युवती इस्लामपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. ३१ मे रोजी त्यायुवतीने कासेगाव येथील संग्राम मदने याच्याशी नृसिंहवाडी येथे जावून लग्न केले आहे. लग्नानंतर संग्राम हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचे युवतीला समजल्यानंतर तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला.
१६ जुलै रोजी पिडीत युवतीला संग्राम मदने याने हॉस्पिटल मध्ये मारहाण केली होती. तु माझ्या सोबत आली नाहीस तर तुझ्या कुटूंबियांना ठार मारीन व तुझ्या तोंडावर अॅसीड फेकीन अशी धमकी दिली होती. या घटनेची माहिती युवतीच्या कुटुंबियांना समजली. त्यांनी मुलीस विचारले असता लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला.मुलीच्या कुटूंबियांनी मुलाच्या नातेवाईकांबरोबर चर्चा करून घटस्फोट घेवून वेगळे व्हायचे ठरवले होते. त्यानुसार आज सकाळी ११ च्या सुमारास पिडीत युवती आई, वडीलांसह एका रिक्षातून इस्लामपूर कोर्टात आली होती. रिक्षा कोर्टाच्या पश्चिमेकडील गेटच्या बाजूला लावली होती.
युवतीचे वडील कोर्टामध्ये कागदपत्रे तयार करण्यासाठी गेले होते. दरम्यान संग्राम मदने हा एका अनोळखी इसमासह दुचाकीवरून रिक्षाजवळ आला. रिक्षाचे दार उगडून युवतीच्या हाताला धरून रिक्षातून बाहेर ओढु लागला. युवतीच्या आईने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता आईच्या गालावर थोबाडीत मारून खाली पाडले. व युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसून ताकारी रोडच्या दिशेने निघुन गेला. या घटनेची माहिती पीडीत युवतीच्या आईने पतीला दिली. त्यांनी शोधाशोध केली असता पिडीत युवती कोठेच आढळून आली नाही. याप्रकरणी संग्राम मदने याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा इस्लामपूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.