सातारा | वाहनाचे ऑईल गळत आहे, असे म्हणत डोळ्यात चटणी टाकून मोबाईल हिसकावून घेऊन कनिष्ठ अभियंता दिलीप महादेव माळी यांना अज्ञात दोन चोरट्यांनी एका वर्षापूर्वी मारहाण केली होती. याप्रकरणी तीन संशयितांना औंध पोलीसांनी मोबाईल लोकेशनद्वारे अटक केली असून अभियंता दिलीप माळी यांच्या पत्नीला अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी, गोपूज कारखान्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपानजीक 28 जुलै 2021 ला ही घटना घडली होती. या प्रकरणात संशयित अमित चंद्रकांत बोलके (वय-30, रा. पाटण), साधना दिलीप माळी (वय-48, रा. पाटण), सागर शंकर भोळे (वय-31, रा. पाटण) यांना अटक केली. दिलीप माळी (मुळ रा. विरवडे, ता. कराड) हे पंचायत समिती वडूज येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस होते. ते व त्यांचा भाचा अथर्व अनिल माळी हे कार्यालयातून सायंकाळी 7 च्या सुमारास कराडला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी ऑईल गळतेय, असे म्हणत दिलीप माळी यांच्या डोळ्यात चटणी टाकून सुमारे 20 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेवून संशयितांनी त्यांना मारहाण करत त्यांचा पाय फॅक्चर केला होता.
सदरची घटना कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलीसांसमोर आली आहे. मोबाईल लोकेशनवरून संशयित आरोपी अमित चंद्रकांत बोलके मुळ रा.पाटण यास मुंबई येथून ताब्यात घेतले असता त्याने दिलीप माळी यांची पत्नी साधना माळी हिनेच आपणास व सागर शंकर भोळे रा. पाटण यास दिलीप माळी यांना मारहाण करण्याची सुपारी दिली होती, अशी माहिती औंध पोलिसांना दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करत आहेत.