कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील शेणोली येथे एका विहीरीत आज रविवारी दि. 17 रोजी वन्यप्राणी सांबर पडले होते. वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने या सांबरास वाचविण्यात यश आले आहे. वनविभागाने वाचविलेल्या सांबरास शेणोली वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडले आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कराड तालुक्यातील शेणोली येथील सुहास कणसे यांच्या विहिरीत वन्यप्राणी सांबर पडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती शेणोलीचे सरपंच विक्रम कणसे यांनी तात्काळ वनविभागाला सांगितली. वनविभागाचे कर्मचारी सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन परिमंडळ कोळे मलकापूरचे बाबुराव कदम, शेणोली वनरक्षक सुनीता जाधव, नांदगाव वनमजूर श्रीकांत मदने, हनुमंत मिठारे, भाऊसो नलवडे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
यावेळी वन्य प्राणी सांबर हे विहिरीच्या पाण्यात असल्याचे तसेच ते जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनकर्मचारी व शेणोली ग्रामस्थांच्या सहकार्याने युवकांनी विहिरीत उतरून सदर वन्यप्राणी सांबर याला जाळ्याच्या व दोरांच्या सहाय्याने सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढले. या सांबराची नीट तपासणी करून ते सुरक्षित असल्याचे खात्री केल्यानंतर त्याला शेणोली वनक्षेत्र नंबर 699 मध्ये नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.