हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह गणेशोत्सवनिमित्त मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीत मनसे- भाजप युतीबाबत ठोस निर्णय होऊ शकतो असेही म्हंटल जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे याना विचारलं असता त्यांनी यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, अमित शाह मुंबई दौऱ्यात कुणाला भेटतील याबाबत मी आताच काही सांगू शकत नाही. ते कुणाला भेटतील, ते कुठे जातील? हा निर्णय तेच घेतात. हा त्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम कसा असेल, हे आम्हाला अद्याप माहीत नाही. पण त्यांनी निश्चितपणे काही कार्यक्रम ठरवले असतील, असे बावनकुळे यांनी म्हंटल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढलेली आहे. राज ठाकरे यांनी हाती घेतलेला हिंदुत्त्वाचा मुद्दा दोनी पक्षांना एकत्र आणू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. अशावेळी आधीच शिंदे गट फुटल्याने अडचणीत असलेल्या शिवसेनेला आणि खास करून उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजप आणि मनसे युतीही करण्याची शक्यता आहे.




