हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात संविधान दिन उत्साहात साजरी करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच न्यायालयाच्या परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा हरियाणातील मानेसर येथील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात उभारला गेला आहे. संविधान दिनादिवशी राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. त्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. गेल्या अनेक दिवसांपासून या पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू होते. अखेर हे काम पूर्ण झाल्यामुळे संविधान दिनादिवशी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी द्रोपर्दी मुर्मूसह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर प्रमुख मंडळी उपस्थित असतील.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांच्या अमूल्य योगदानामुळेच आज भारताला संविधान लाभले आहे. याच संविधानावर आज भारत देश चालत आहे. गेल्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला होता. त्यामुळे हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरी केला जातो. याच दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.