हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार कोसळुन भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केली. तुल्यबळ असलेल्या भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत थेट संकेत देत ‘मविआ’ ने एकत्रच लढल पाहिजे अस म्हंटल आहे.
शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना महाविकास आघाडी बाबत विचारले असता पवार म्हणाले, राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र लढायला हव्यात. आम्ही एकत्र लढलो तर लोकांना त्यांना हवं तसं मतदान करून निर्णय घेता येईल. पण यासाठी आधी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा केली पाहिजे, तिघे एकत्र बसून याबाबत शक्य झाले तर निर्णय घेऊ असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.
https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/5224314667604382/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C
दरम्यान, संसद भवन परिसरात निदर्शनं, उपोषणं करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आली आहे. या निर्णयावरही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात मागणी मान्य झाली नाही तर लोग सभात्याग करतात, मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात. केंद्र सरकारने शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे, पण जेव्हा जेव्हा हुकूमशाही आली तेव्हा तेव्हा ती संपली. सत्तेचा गैरवापर टिकत नाही असा इशारा पवारांनी भाजपला दिला.




