हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज ठाकरेंनी यंदा भाषणांचा कितीबी किस पाडूंद्या. येणार तर ठाकरेच! मशालीच्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार हे मुंबईचं वातावरण… पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आटोपल्यावर पाचव्या टप्प्यामुळे राज्याची निवडणूक मुंबईकडे शिफ्ट झालीय… शिवसेनेचं, ठाकरेंचं जे आत्तापर्यंतचं राजकारण जिवंत आहे ते मुंबईच्या जीवावर. पण आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यामुळे मुंबईतून जास्तीत जास्त खासदार जो दिल्लीत पाठवणार, त्याची शिवसेना…असं साधं गणित असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यासाठी पर्वा पार पाडणारी निवडणूक ही जिवापेक्षा जास्त महत्वाची… मुंबईतल्या एकूण 10 जागांपैकी बहुंताश ठिकाणी थेट ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होतेय. पण शिवसेना फोडण्याचा इम्पॅक्ट म्हणून मुंबईत सहानुभूतीची लाट ठाकरेंच्या बाजूने दिसतेय. चार टप्प्यातही वारं हे मविआच्याच बाजूने काही प्रमाणात झुकल्याचं पाहायला मिळतंय. हाच डॅमेज रोखण्यासाठी महायुतीनं फ्रंटला केलं ते राज ठाकरेंना… राज ठाकरेंनी मुंबईत शिंदेंच्या उमेदवारांसाठी जीव तोडून भाषणं केली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला टार्गेट करत शिंदेंच्या शिवसेनेसाठी नरेटीव सेट केलं… मात्र कालच्या महायुतीच्या शिवाजी पार्कवरील विराट सभेतील राज ठाकरेंनी केलेल्या एका भाषणामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुपडा साफ होणार की काय, अशी चर्चा आहे. मुंबईतून मशाल विझवण्यासाठी राज ठाकरेंनी जाहीर सभेतून केलेल्या 6 मागण्यांमुळे मतदान फिरणार असं दिसतंय. राज ठाकरेंमुळे शिवसेनेची मशाल मुंबईतच कशी धोक्यात आलीय… त्यासाठी त्यांनी 6 मागण्यांचं पॉलिटिक्स कसं खेळलंय? तेच जाणून घेऊयात
तर महाराष्ट्रातील मुंबईत पार पडणाऱ्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या… महाविकास आघाडी कडून बीकेसी वर तर महायुतीकडून शिवाजी पार्कवर विराट सभा झाल्या..यात महायुतीच्या सभेसाठी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून आघाडीवर जोरदार प्रहार केला. मात्र नेहमीप्रमाणे भाषणाची छाप सोडली ती राज ठाकरे यांनीच… राज ठाकरे यांनी आपल्या अगदी आटोपशीर भाषणात मुंबईकरांची मनं जिंकत 6 मागण्या केल्या… ठाकरेंच्या या भाषणामुळे मुंबईत मशाल विझतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली…. राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवातच झाली ती जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं… जवाहरलाल नेहरूनंतर भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी असा उल्लेख करत त्यांनी त्यांचा गौरव केला… मोदी सरकारने राम मंदिर, कलम 370, ट्रिपल तलाक यांसारख्या घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचा पाढा वाचत मोदी सरकारचं कौतुक देखील केलं. पण यापुढे त्यांनी येत्या 5 वर्षांसाठी त्यांनी मोदींकडे सहा मागण्या करत मोठं व्होटिंग आपल्या बाजूने खेचून आणलं ..
मोदींकडे राज ठाकरेंनी केलेली पहिली मागणी म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा…
अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, यासाठी राज्य सरकारचा लढा सुरू आहे. मात्र मराठीला अजूनही अभिजात दर्जा देण्यात आलेला नाही. हा दर्जा मिळाला तर मराठीच्या संवर्धन आणि विकासासाठी मोठं आर्थिक पाठबळ केंद्र सरकारकडून मिळू शकतं… त्यामुळे ही पहिली मागणी करून मुंबईतील मराठीविषयी अभिमान बाळगून असणाऱ्या मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला…
हीच लाईन पुढे मोठी करत राज ठाकरेंनी केलेली दुसरी मागणी म्हणजे मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात घेण्यात यावा…
देशाच्या इतिहासात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं स्वतःच असं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र याचा राज्यातील पाठ्यक्रम वगळता फारसा कुठे उल्लेख नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून सर्व पाठ्यक्रमांमध्ये मराठा साम्राज्याच्या इतिहासाची आवश्यक नोंद घेतली जावी, अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली… तसं पाहायला गेलं तर भाजप हा मुंबईत उत्तर भारतीयांसाठी आणि अमराठी लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जातो… यामुळे आपसूकच मराठी लोकांची मत ही परंपरेनुसार शिवसेनेला मिळत गेली… पण शिंदेसेना भाजपसोबत असल्याने ही वोट बँक ठाकरेंच्याच पाठीशी राहु शकते. हाच गॅप ओळखून राज ठाकरेंनी मराठी लोकांच्या भावनिकतेला साद घालत शिंदेंना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, याचा प्रयत्न केलाय…
तिसरी मागणी म्हणजे गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती…
अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा करूनही अजूनही ते काम रेंगाळलेलं आहे. त्यापेक्षा महाराजांच्या गड-किल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती स्थापन करण्याची मागणी करून त्यांनी तरुण, शिवप्रेमी गटाला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भाग पाडलंय…
चौथी मागणी ती मुंबई गोवा महामार्गाची…
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे. मुंबईत असणारा कोकणकर हा मुंबईच्या राजकारणातील किती निर्णायक फॅक्टर आहे, याची कल्पना आपल्याला आहेच… अर्ध्याहून जास्त कोकणकर हे मुंबईत वसलेत.. त्यांचा हाच व्होट शेअरिंग पर्सेंट लक्षात घेऊन राज ठाकरेंनी ही मागणी केली… विशेषकरून कोकण हा शिवसेनेचा आणि ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. यावरून मशालीची मतं फोडण्यासाठी राज ठाकरेंनी किती मायन्यूट विचार केलाय, याचा आपण अंदाज लावू शकतो…
पाचवी मागणी ती हिंदुत्वाचं राजकारण आणखीन प्रखर करण्याचं…
एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच महायुतीत सामील झाले. हिंदुत्वाच्या राजकारणाचीच लाईन मोठी करतच भाजप आणि शिंदेंनी महायुती सरकार चालवलय. त्यालाच निवडणुकीच्या तोंडावर आणखीन हवा देत राज ठाकरेंनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. राज ठाकरे म्हणाले, ओवेसी सारख्या औलादी आहेत. त्यांच्या अड्ड्यांवर सैन्य घुसवून एकदाचा देश सुरक्षित करा, अशी मागणी करून मुंबईतून प्रखर हिंदुत्वला निवडणुकीच्या दोन दिवस आधी धार आणलीय…यामुळे हिंदू व्होट बँक या धार्मिक आवाहनाला साद घालत शिंदेंच्या धनुष्यबाणाचे हात बळकट करणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
सहावी आणि शेवटची मागणी ती म्हणजे संविधानाला धक्का न लावण्याची…
अबकी बार 400 पार हे लोकसभेसाठी भाजपने कॅम्पेन रन केल्यापासून काही दिवसातच विरोधकांनी यावर जोरात हल्ला चढवला… भाजपची ही घोषणा संविधान बदलण्यासाठीच आहे, असं नरेटिव्ह विरोधकांनी सेट केलं. हाच प्रचारातील आपला मुख्य मुद्दा बनवला.. पहिल्या चार टप्प्यात याचा मोठा लॉस भाजपला बसल्याचं बोललं गेलं… यानंतर हेच नरेटीव्ह पुसण्यासाठी मोदींना वारंवार जाहीर भाषणातून देशाचं संविधान कुणीही बदलू शकत नाही, हे जाहीररीत्या सांगाव लागलं… याचाच इम्पॅक्ट शिंदेंवर पडू नये यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमधून डॅमेज कंट्रोलचं काम केलं…
थोडक्यात हिंदुत्वाचा मुद्दा, मराठा मतं, कोकणचे मतदार आणि तरुणांची ठाकरेंच्या बाजूने असणारी ही गेमचेंजर आणि सहानुभूतीची मतं शिंदेंकडे वळती करण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून पुरेपूर प्रयत्न केलाय. आता फक्त या वातावरणाचा फायदा मतांमध्ये कन्व्हर्ट होतो का? हे येत्या 20 तारखेलाच समजेल..राज ठाकरेंच्या शिंदे गटासाठी सुरू असणाऱ्या या झंझावाती प्रचारामुळे उद्धव ठाकरेंची मशाल मुंबईतून विझेल, असं तुम्हाला वाटतं का? की महायुतीचा आणि राज ठाकरेंच्या या प्रयत्नांचा फुगा फुटून जाईल? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.