कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महसूल विभागातील तलाठी कार्यालयातील सर्व्हर गेल्या आठ दिवसांपासून डाऊन असल्याच्या कारणाने शेतकऱ्यांसह जमिन खरेदी- विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तलाठी आणि नागरिकांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होवू लागले आहेत. सर्व्हर डाऊनचा प्रश्न लवकरात लवकर मिटविण्याची मागणी तलाठी कर्मचारी व जनतेतून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सातबारा उतारा संबधीचे सर्व्हर मागील सात दिवसांपासून डाऊन असल्याने शेतकरी वर्गाची ससेहोलपट होत आहे. कराड तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयांतील सर्व्हर डाऊन असल्याने जमिन खरेदी- विक्रीचे व्यवहार करणारे वैतागले आहेत. अलिकडील काळात अनेक शासकिय कामे ऑनलाईन झाली आहेत. मात्र शेतकरी वर्गाला येणारा सर्व्हर डाऊनचा प्रश्न जिल्हाधिकारी मार्गी लावणार का? शेतकऱ्यांची ससेहोलपट जिल्हाधिकारी थांबवणार का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
ग्रामिण भागातील जनतेचा तलाठी कार्यालयाशी रोजचा संपर्क येत असतो. शेतीशी निगडीत कामानिमित्त, सातबारा उतारा संबंधीत बाबींसाठी तलाठी कार्यालयात गेले असता सर्व्हर डाऊन आहे असे कारण देऊन उद्या येण्यास सांगितले जाते. दुसऱ्या दिवशीही अशीच समस्या आल्यास दोन दिवसांनी येण्यास सांगितले जाते. वारंवार येणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे आता शेतकरी वर्ग वैतागला असून यावर शासनाने काहीतरी उपाय शोधून काढणे गरजेचे बनले आहे
सातबारा ऑनलाईनच्या बाबतीत सर्व्हर डाऊन असल्याने जनता तलाठ्याच्या अंगावर यायला लागली आहे. सातबारा ओपन होत नाही, मार्चअखेरमुळे लोकांना सातबारा मिळत नाही. आमच्याकडे सही आहे, लॅपटॉप आहे, नेट आहे असे असताना केवळ सर्व्हरच्या अडचणीमुळे सातबारा लोकांना देवू शकत नाही. लोकांना बाहेर खासगी ठिकाणी गेले तर सातबारा मिळतो, त्यामुळे तलाठी मुद्दाम देत असे लोकांच्याकडून सांगितले जाते. एका दिवसांत एकादा सातबारा नोंद होत आहे. सर्व्हरचे स्पीड चांगले द्या तलाठी काम करायला बसलेले आहेत. जनता तलाठ्यांना नांवे ठेवायला लागलेली आहे. सर्व्हरला चांगले स्पीड द्या अन्यथा सोमवारी शासनाकडे डीएससी तहसिलदार कार्यालयात जमा करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे यांनी दिला आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांना कोणी वाली नसल्याचे सांगितले. तसेच सर्व्हराचा प्रश्न न मिटविल्यास तहसिलदार कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे.
ऑनलाईन उताऱ्यासाठी दिवसभर बसूनही मिळत नाही. सर्व्हर डाऊनमुळे शारिरिक, मानसिक व अर्थिक नुकसान होत आहे. त्यावर शासनाने काहीतरी पर्याय काढावा. तलाठी कार्यालयात केवळ सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जात आहे. वरिष्ठही सर्व्हरचे कारण सांगत आहेत, आमच्या कामाकडे कानाडोळा करत असून अधिकाऱ्यांची काम करण्याची इच्छाच नसल्याचे गोवारे येथील शेतकरी रूपेश रंगनाथ पवार यांनी सांगितले.