टेम्पोच्या धडकेत मामी ठार तर भाची गंभीर जखमी

Karad News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलकापूर, ता. कराड येथील मामी व भाचीच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दुचाकीवरील मामीचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिची भाची गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली.

गुलशन निजाम मुल्ला (वय- 50, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कार्वेनाका ता. कराड, मूळ रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे (मामी) नाव आहे. तर सिमरन राजू पटेल (भाची) या गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वेनाका येथील त्रिमूर्ती कॉलनीमध्ये राहणाऱ्या गुलशन मुल्ला व सिमरन पटेल या दोघी मुलगा समीर यांच्यासमवेत दुचाकीवरून कामेरीला निघाल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास ते महामार्गाच्या उपमार्गावर मलकापूर गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर आले असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. टेम्पोच्या धडकेनंतर गुलशन मुल्ला या टेम्पोच्या चाकाखाली सापडल्या, तर समीर शेरकर आणि सिमरन हे दोघे जण बाजूला पडले.

अपघातानंतर टेम्पो जागेवरच सोडून चालकाने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन तिघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी गुलशन मुल्ला यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर सिमरन पटेल यांच्यावर उपचार सुरू आहेत. समीर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.