हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची आणखी एक संशयास्पद घटना समोर आली आहे. Online Order केलेली बिर्याणी खाताच केरळ येथील एका 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अंजू श्रीपार्वती (Anju Sriparvati) असे सदर महिलेचं नाव असून त्यांनी 31 डिसेंबर रोजी कासारगोड येथील रोमान्सिया नावाच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन बिर्याणी (Online Biryani) ऑर्डर केली होती. ती खाल्ल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. त्यांनतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी महिलेच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचा मृत्यू हा शनिवारी सकाळी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. खरं तर बिर्याणी खाऊन त्रास झाल्यानंतर या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी घटनेचा अहवाल देण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले आहेत. डीएमओ देखील या घटनेची आणि मुलीला देण्यात आलेल्या उपचारांची पाहणी करत आहेत असे वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा आणि स्टॅंडर्ड कायद्यांतर्गत (FSSA) अन्नातून विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
धक्कादायक म्हणजे या आठवड्याच्या सुरुवातीला, कोट्टयम मेडिकल कॉलेजच्या एका नर्स चा कोझिकोडमधील भोजनालयातील अन्न खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नर्स रेश्मी राज (33) यांनी येथील हॉटेल पार्कमधून ‘अल फहम’ हा अरबी चिकन डिश मागवला होता. मात्र ते चिकन खाताच त्यांची तब्ब्येत बिघडली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातच आज हे अजून एक नवं प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.