औरंगाबाद – जालना रोडवरील एका सोन्या-चांदीच्या दुकानातून शनिवारी 1 लाख 42 हजार यांची हिरेजडित सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या बुरखाधारी महिलेला काल जिन्सी पोलिसांनी अटक केली असून, तिच्याकडून बांगडी जप्त करण्यात आली आहे. शबाना बेगम उर्फ शब्बो शेख जलील (30) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
जिन्सी पोलिसांनी सांगितले की, मलबार गोल्ड अँड डायमंड या सोन्या-चांदीच्या दुकानात एक बुरखाधारी महिला खरेदीच्या निमित्ताने आली होती. यावेळी सेल्समन अशोक अंकुश गायकवाड हे त्यांना दागिने दाखवत होते. घाई असल्याचे सांगून त्या महिलेने गायकवाड यांची नजर चुकून 24 ग्रॅम 500 मिली ग्रॅमची सोन्याची बांगडी चोरून नेली होती. नंतर ती रिक्षात बसून पळून गेली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा चोरी शंब्बोने केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार संपत राठोड, पोलीस नाईक नंदुसिंग परदेशी, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण, संतोष बनावत यांच्या पथकाने तिची चौकशी केली. मात्र ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मग रिक्षाचालकाला पोलिसांनी शोधून काढले. तेव्हा त्याने तिला ओळखले पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली देऊन बांगडी काढून दिली.