लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील शिवणी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. या आरोपी महिलेने आपला 21 वर्षीय प्रियकर आणि गावातील अन्य एक जणाच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली. आरोपींनी मृत तरुणाला दारू पाजून त्याची गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेला आणि तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या महिलेचा प्रियकर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मृत व्यक्तीचे नाव किशोर विठ्ठल सुतार असे असून ते शिवणी येथील रहिवासी होते. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी मनीषा, प्रियकर अविनाश नवनाथ गुरने आणि त्यांचा साथीदार धनाजी सूर्यभान वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल केला. मृत किशोर याचं मनीषा हिच्याशी काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. विवाहानंतर या दाम्पत्याला तीन मुलं देखील झाली. पण पती किशोरच्या दारूच्या व्यसनाला पत्नी मनीषा खूप वैतागली होती. यादरम्यान मनीषाचे त्याच गावातील 12 वर्षींनी लहान असणाऱ्या अविनाशसोबत सूत जुळलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते.
या अनैतिक संबंधाचा संशय किशोरला आल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अनैतिक संबंधात येणारा अडसर कायमचा दूर करण्यासाठी मनीषा हिने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. या कटात मनिषाने प्रियकर अविनाशलासुद्धा सामावून घेतले. पण एकट्याला ही हत्या करता येणार नाही. म्हणून या दोंघांनी आणखी एकाला या कटात सामावून घेतले. यानंतर ठरलेल्या प्लॅनिंगनुसार आरोपींनी घटनेच्या दिवशी किशोरला शुद्ध जाईपर्यंत दारू पाजली. शुद्ध हरपताच आरोपी किशोर याला गावापासून अर्धा किलोमीटर लांब एका शेतात घेऊन गेले. या ठिकाणी आरोपींनी मफलरने गळा आवळून किशोरची हत्या केली. यानंतर मृतदेह जवळच्याच एका शेतात टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनीषा आणि धनाजी याला अटक केली आहे. तर फरार आरोपी प्रियकर अविनाश याचा शोध सुरु आहे.