हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचाची हत्या करून अज्ञातानी तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. तुडील भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी येथे हि घटना घडली आहे.
मीनाक्षी मनोहर खिडबिडे (48) असे मृत्यू झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहता महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाड तालुक्यातील तुडील भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी परिसरात रस्त्यावरून एक तरुण महाडकडे जात होता. यावेळी त्याला जंगलाच्या भागात एक महिला मृतावस्थेत पडलेली दिसून आली. यानंतर त्या युवकाने याची माहिती पोलिसांना दिली. मृत्यू पावलेली महिला ही महाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच असून महिलेच्या डोक्यात अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महिला सरपंचाचा मृतदेह आढळल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा पंचनामा करुन महिला सरपंचाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आपल्याच गावातील महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे.