सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास तलाव भरन वाहू लागला आहे. त्यामुळे आज सातारा पालिकेच्या आजी – माजी नगरसेविका, महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते तलावाच्या पाण्यात साडी, खण आणि नारळाने ओटी भरण करण्यात आले.
कास तलाव दोन दिवसांपूर्वी ओव्हर फ्लो झाला असून तलावात 0.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तलाव भरल्यामुळे सातारकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे. तलावाच्या सांडव्यावरील पायऱ्यावरून पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
वर्षभर सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव भरून वाहू लागल्यावर कृतज्ञता म्हणून ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा कार्यक्रम घेता आला नाही. यावर्षी ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आवर्जून उपस्थित असतात. मात्र, उदयनराजे भोसले संसदीय कामकाजानिमित्त दिल्लीत असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, संग्राम बर्गे, डी. जी. बनकर, किशोर शिंदे श्रीकांत आंबेकर, सागर भोसले, शिवानी कळसकर, अश्विनी पुजारी, माजी नगराध्यक्ष रंजना राऊत, सुजाता राजेशिर्के, सीता हादगे, राम हादगे आदींसह नगरसेवक आणि नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.