परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यातील गारठून टाकणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील चुलीसमोर बसलेल्या महिलेच्या साडीने अचानक पेट घेतल्याची दुर्दैवी घटना नववर्षाच्या सायंकाळी पाथरी तालुक्यात घडली. याघटनेत महिलेचा परभणीत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (वय ६० ) ह्या बुधवार दि. १ जानेवारी रोजी घरातील पेटवलेल्या चुलीसमोर उब मिळावी म्हणुन बसल्या होत्या, यावेळी त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. दरम्यान घरात कोणीही नसल्याने त्यांच्या किंचाळ्या ऐकून गल्लीतील काहींनी त्यांना वाचवण्यासाठी येईपर्यंत सदरील महीला ७४% गंभीर भाजली गेली.तात्काळ त्यांना गावातील शासकीय रुग्णवाहिकेद्वारे परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ,उपचारा दरम्यान गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांचा मृत्यु झाला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झालाय. त्यात जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट झाल्याने सकाळी व सायंकाळी हुडहुडी भरत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी व शरीराला ऊब मिळावी म्हणुन नागरिकांकडून शेकोटीचा आधार घेतला जातोय. पण याच शेकोटीने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील महिलेचा घात केला.