सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्ह्यातील जावळी तालुका दुष्काळाने होरपळला आहे. अशात वेळे ढेन या गावातील एका २३ वर्षीय महिलेचा पाण्याने बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. स्वाती भगवान कोकरे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव अाहे. वयाच्या २३ व्या वर्षी असं मरण आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गावातील नळ पाणीपुरवठा योजना तोकडी पडत असल्याने सदर महिला गावाचलगतच्या एक किलोमीटर दूर असणाऱ्या पाण्याच्या झऱ्यावर हंडा भरण्यासाठी गेली होती. यावेळी महिला उन्हाच्या झळांमुळे कोसळली आणि तेथेच त्या महिलेचा मृत्यू झाला. सध्या जावळी तालुक्यामध्ये ५१ गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
जावळी तालुक्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडण्याचा विक्रम आहे. मात्र याच जावळी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपिटी करताना महिलेचा बळी गेला असल्याने खळबळजनक उडालीय. दुष्काळात पाणीटंचाईने एका महिलेचा बळी गेला असूनसुद्धा प्रशासनाने मात्र यावर हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे.