सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील कास भागातील मौजे कुसुंबीमुरा आखाडेवस्ती येथील नागरिकांना मोठ्या पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात महिलांना आणि लहान मुलांना झऱ्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन लहान- लहान मुले आणि महिला डोंगर कपारीतून पायवाट काढत ते 3 किलोमीटर रोज प्रवास करतात. या पाणी प्रश्नाची योग्य दखल प्रशासनाने व राजकीय पुढाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील 24 कुटुंबे असणाऱ्या आखाडेवाडीतील 200 च्या घरात लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत होता. ज्या झऱ्यातून पाणी टाकीत सोडले जात होते, त्या झऱ्याचेच पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवड्यात झऱ्यातून टाकीत आणण्याचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे.
अवकाळी पावसाने झऱ्याचे पाणी वाढले जात नसून पावसाळ्यातील पावसाने जेव्हा पठारावर पाणी साचून राहते, तेव्हाच झऱ्याच्या पाण्यात वाढ होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.झऱ्यावर ग्रामस्थ नंबर लावून रात्रभर जागून आळीपाळीने पाणी भरत आहेत. रात्री पाण्यासाठी बाहेर पडायचे म्हटले तर वन्यश्वापदांची भीती. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे डोंगरकपारीतील झरेही आता आटण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.