जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जो उमेदवार नवऱ्याला दारू पाजेल त्याला आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. निवडणुका म्हटलं कि उमेदवारांकडून अनेक प्रलोभने मतदारांना दाखवली/दिली जातात. अश्याच दारूच्या प्रलोभनात येऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या सर्च आणि शासनाच्या मुक्तीपथ या संस्थांच्या वतीने ही अनोखी जनजागृती केली जात आहे. ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असा सज्जड दम देणारे हे होर्डिंग्ज नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. जनजागृती करणारे हे होर्डिंग्ज जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष आकर्षित करीत आहेत आणि उमेदवारांना इशारा देत आहेत. या होर्डिंगवर कुणाचेही नाव नाही किंवा कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ज्या दारुचा वापर केला जातो, त्या प्रथेवर हा प्रहार आहे.

डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या नेतृत्वातील महिलांच्या लढ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र आज या निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात पुन्हा दारूचे पाट वाहत आहेत. त्यामुळे मुक्तिपथ संस्थेने जनजागृतीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. गावागावात जाऊन महिलांना संघटित करून दारू आणि व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. गडचिरोली, आरमोरी, वडसा, चामोर्शी, कुरखेडा, अशा ५ तालुक्यांत हे होर्डिंग्ज झळकले आणि एकच चर्चा सुरू झाली. या होर्डिंग्जचे कौतुक अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनीही केले आहे. या होर्डींग्जमुळे गावातील महिलांनी एकत्र येत निर्धार करून दारू वाटणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा फटका अश्या उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्तेही आता सावध झाल्याचे पाहायला मिळत आहे.