पाटणला राजकारण तापले : काम खासदाराचे अन् श्रेयवाद आजी- माजी आमदार गटात

पाटण | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून मंजूरी मिळालेल्या चाफळ विभागातील दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकव पुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. विकासकाम मंजूर खासदारांकडून अन् वाद आजी- माजी आमदारांच्या दोन गटात सुरू झाला आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. साकव पुलाच्या कामाच्या ठेकेदाराने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम कसे सुरू केले. याबाबत विचारणा करत सदरचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. यामुळे येथील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते.

कामासाठी आम्ही पाठपुरावा केला, काही लोकांनी काम बंद पाडले : संभाजी डांगे 

आमची शिवसेनेची ग्रामपंचायतीची सत्ता 2017 साली होती. 2018 साली जानाई मंदिर म्हणून हे काम आले होते, तेव्हा जानाई मंदिर नव्हते असे ग्रामपंचायतीने सांगितले होते. त्यामुळे त्यावेळी मंजूर काम परत गेले होते. या कामासाठी खासदार श्रीनिवास पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दोघांचीही शिफारशीवर नावे आहेत.   त्यापासून या कामासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. कारखान्यावरून जेसीबी आल्याने आम्ही नारळ फोडून दिवसभर जेसीबीने काम केले. त्यानंतर काही लोकांनी सुरू काम बंद पाडले. आमच्या गावात दोन गट असले तरी कोणताही वाद नसल्याचे देसाई गटाचे संभाजी डांगे यांनी सांगितले.

ठेकेदारामुळे दाढोलीत वाद उफाळला : प्रकाश पवार

11 डिसेंबर 2021 रोजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत कामांचा शुभारंभ करणार होता. विरोधकांनी एक महिन्यापूर्वी याच भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला होता. ठेकेदाराने राजकीय भूमिका घेतल्याने हा वाद निर्माण झाला आहे. दाडोली ऐवजी जाळगेवाडी येथे व्हावे असे गृहराज्यमंत्र्यांनी शिफारस केली होती. तरीही कामाला विरोध असताना देसाई गटाने कामांचा शुभारंभ केला. आमच्याकडे कागदपत्रे असून विरोधक केवळ तोंडी सांगत असल्याचा आरोप पाटणकर गटाचे समर्थक व दाढोलीचे उपसरपंच प्रकाश पवार यांनी केला.