दहिवडी | समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजे आरोग्य उपकेंद्रात 6 जुलै रोजी नियमित लसीकरण सुरू होते. त्यावेळी तिथे कार्यरत असणारे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास लावून लसीकरणाच्या ठिकाणीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
या घटनेचा निषेध म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले. या घटनेचा वरिष्ठ पोलिस यंत्रणेकडून सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करून डॉ. गणेश शेळके यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तुषार खाडे, डॉ. समीना तांबोळी, नम्रता ओंबासे, डॉ. प्रसाद आवळे, डॉ. सचिन गाडे, डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. दिनेश गंबरे, डॉ. सुजित खाडे, डॉ. पूनम पुजारी, डॉ. संजीवनी गोळे. विवेकानंद गिरगावकर, रोहित पाटील व माधुरी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.