सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अवर्षण अतिवृष्टी भारनियमन इत्यादी परिस्थितीमध्ये महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही वेळोवेळी काम करतो. मात्र, ठेकेदारांची बिले सहा- सहा महिने प्रलंबित राहतात. त्यामुळे आम्हाला प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसात निर्णय न झाल्यास आम्ही सर्व कामे बंद करू, असा इशारा सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
साळुंखे पुढे म्हणाले , “इलेक्ट्रिक कामासाठी लागणारे स्टील कॉपर ॲल्युमिनियम ट्रांसफार्मर केबल फॅब्रिकेशन इत्यादी वस्तूंच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र महावितरणच्या दर सूचीमध्ये या किमती सरकारी दराप्रमाणे खूपच कमी आहेत. महावितरण चे सध्याचे दर 2018- 19 चे आहेत. बांधकाम विभाग, सातारा औद्योगिक वसाहत, जिल्हा परिषद येथे दर वर्षी दरसूचीच्या सुधारित दरानुसार काम केले जाते. मात्र, महावितरणचा दर मात्र अजूनही जुनाच आहे. या संदर्भात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वारंवार जिल्हा संघटना व राज्य संघटना यांनी पाठपुरावा करूनही अद्यापही काही प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन कॉस्ट डेटा यासंदर्भात प्रस्ताव संचालकांकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, तीन महिने उलटले तरी या विषयावर निर्णय झालेला नाही.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये ठेकेदारांनी महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अडीअडचणीच्या काळात कामे केली. मात्र, सहा महिने उलटले तरी महावितरणच्या प्रकाश गड येथील मुख्य कार्यालयाला बिले जाऊनही अद्याप त्याची देयके अदा झालेले नाहीत. त्यामुळे जीएसटी भरणे बँक लोण हप्ते भरणे प्रलंबित देणी देणे कामगारांचे वेतन इत्यादी काम पूर्ण करण्यामध्ये ठेकेदारांची प्रचंड अडचण होत आहे. या संदर्भात गेल्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संपूर्ण सातारा जिल्हा व महाराष्ट्रातील काम बंद करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेस संघटनेचे उपाध्यक्ष अनिल बामणे सचिव प्रवीण कोल्हे खजिनदार पृथ्वीराज पवार उपस्थित होते.