औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंगकाम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान भावसिंगपुरा येथील २८ वर्षीय सोहन जगदीश लांडगे हा व्यवसायाने रंगकाम करतो. मंगळवारी नेहमी प्रमाणे तो सकाळीच कामावर गेला होता. सध्या औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यालगत असलेल्या रवी सोनवणे यांच्या इमारतीचे रंगकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचे रंगकाम करावयाचे असल्याने तो दोरीच्या झुल्यावर काम करत होता. मात्र सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक तोल जाऊन तो पडला. ही घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी तौबा गर्दी केली.
इतर कर्मचारी आणि नागरिकांनी तत्काळ लांडगे यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री ८ वाजता त्याची प्राणज्योत मावळली. लांडगे यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा त्यांचा परिवार आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. हा आनंद मावळत नाही तोच त्यांच्या अचानक जग सोडून जाण्याची माहिती मिळताच नातेवाईकांकडून तसेच भावसिंगपुरा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.