औरंगाबाद – स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्चएण्डला अठरा कामांच्या 635 कोटींच्या निविदा अंतिम केल्या आहेत. ही कामे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली असून, सर्वात मोठे काम म्हणजे 317 कोटींचे रस्ते आगामी नऊ महिन्यात होणार आहेत. स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा 31 मार्चपर्यंत अंतिम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने 18 कामांच्या 635 कोटींच्या निविदा अंतिम केल्या.
दरम्यान, यातील बहुतांश कामे सुरु झाली आहेत. 317 कोटींच्या रस्त्यांचे सर्वात मोठे काम असून, तीन टप्प्यात 108 रस्त्यांची कामे नऊ महिन्यात पूर्ण केली जाणार आहेत. त्याचबरोबर सफारी पार्कच्या दुसरा टप्पा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृहाचे नूतनीकरण, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ, सीसीटिव्ही अद्ययावत करणे, अशा कामांचा यात समावेश आहे.
134 कोटींची जास्तीची कामे –
स्मार्ट सिटी अभियान एक हजार कोटींचे होते. मात्र औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 61 कामांच्या 1224 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र शेवटच्या टप्प्यातील 18 कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये तब्बल नव्वद कोटींची बचत झाली. या निविदा अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने आल्या होत्या. या बचतीमुळे 1134 कोटी रुपयांचीच बिले स्मार्ट सिटीला द्यावी लागणार आहेत. त्यामुळे 134 कोटींचा अधिकचा निधी उभारण्याचे आवाहन असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते.