लॉकडाउन हटवण्याची घाई, महागात पडेल- WHO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंथा । सध्या संपूर्ण देशाला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. गेली १८ दिवस लोक घरात बसून आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, रस्ते वाहतूक बंद आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत लॉकडाऊनच्या भवितव्याबाबत चर्चा होत असताना जागतिक आरोग्य संघटने(WHO)कडून एक सूचक इशारा देण्यात आला आहे.

लॉकडाउन उठवण्याची घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असं WHOचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे. जिनिवामधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही ठिकाणी करोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.

लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील असं टेड्रोस एडहानोम याचं म्हणणं आहे. ”लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील,” असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतरच लॉकबाबत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”