हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघाताच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्यात. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील वरळीत हिट अँड रनची (Worli Hit And Run) धक्कादायक घटना घडली. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीनं उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या अपघातात एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागेल आहे. तर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. फरार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. त्यातच भर म्हणजे अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता तशीच पुढे चालवत महिलेला फरफटत नेलं.
या अपघातात नवरा थोडक्यात वाचला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. सदर महिलेला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं. जर कार चालकाने वेळीच कार थांबवली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. या अपघातानंतर घाबरलेल्या कार चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. वरळी पोलीस चालकाच्या शोधात असून या प्रकरणात पुढील तपास करत आहे.