सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई त्यांच्या बेधडक काम आणि दांडग्या जनसंपर्कांमुळे प्रसिद्ध आहेत. परंतु आता त्यांच्या पुढे एक पाऊल टाकत त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी बाप शेर तो बेटा सव्वाशेर असे दाखवून दिले आहे. यशराज देसाई यांनी एका सामान्य कुटुंबातील लग्नात जाऊन नवरदेवाला चक्क नोकरीची ऑर्डरच भेट म्हणून देत अविस्मरणीय धक्का दिला आहे. हि घटना पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम भागातील लेंढोरी या छोट्याशा गावात घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
घडलं असं की, कोयना विभागातील दुर्गम भागात पाटण पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर लेंढोरी या छोट्याशा गावात झोरे कुटुंबातील जगन्नाथ झोरे या युवकाने काही दिवसांपूर्वी शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. आणि शिवदौलत सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या नोकर भरतीकरीता यशराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखती दरम्यान जगन्नाथ झोरे याने मुलाखत झाल्यानंतर यशराज देसाई यांना आपल्या लग्नाची लग्न पत्रिका देऊन लग्न सोहळयास अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.
युवा नेते यशराज देसाई यांनी कोयना विभागातील लेंढोरी येथील जगन्नाथ झोरेची या युवकाची काम करण्याची प्रामाणिक जिद्द आणि उमेद आणि उच्चशिक्षितपणा यांची दखल घेऊन याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेशी चर्चा केली. तसेच जगन्नाथची शिवदौलत बँकेमध्ये क्लार्क या पदासाठी निवड केली. मात्र, हि आनंदाची बातमी जगन्नाथला त्याच्या लग्नात देण्याचा निर्णय यशराज देसाई यांनी घेतला. त्यानंतर जगन्नाथ झोरे याच्या विनंतीवरुन लग्न सोहळयाला उपस्थित राहत त्याला पुढील वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू
शिवाय या शुभेच्छांसह त्याला शिवदौलत बँकेतील क्लार्क या पदावरील नोकरी बाबतचे नियुक्ती पत्र ही अनोखी भेट दिली.वास्तविक थेट मंत्री पुत्रानेच प्रत्यक्ष येऊन अशा कायमच्या नोकरीचे पत्र देणे अशा घटना दुर्मिळच घडतात. मात्र, हि घटना यशराज देसाई यांनी सत्यात उतरवून दाखविले. त्यामुळे दुर्गम भागातील एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कायमचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान उपस्थितांच्या डोळ्यातील आनंदाश्रू वरून स्पष्ट झाले.