हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) होय. आज त्यांची १११ वी जयंती. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र, ते कधी डगमगले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील न विसरणारा एक प्रसंग म्हणजे कराड येथे मध्यरात्री त्यांच्यावर झालेला खुनी हल्ल्याचा प्रयत्न. यशवंतरावांवर कुणी केला होता खुनी हल्ल्याचा प्रयत्न? कसे ते त्यातून बचावले? हे आपण जाणून घेणार आहोत ‘हॅलो महाराष्ट्र’ च्या या विशेष लेखामध्ये…
तो काळ होता १९४७ – ४८ सालचा. यशवंतराव चव्हाण तेव्हा मुंबई येथे गृहखात्याचे उपमंत्री होते. त्यावेळी आमदार चंद्रोजी पाटील यांच्या खूनाचा आळ घेऊन यशवंतराव चव्हाण यांचे जिवलग मित्र असलेल्या के.डी. पाटील यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मित्रानंतर यशवंतरावांना देखील संपवायच्या हेतूतून काही लोकांनी त्यांच्यावर खास पाळत ठेवली होती..
कराड येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. यशवंतराव चव्हाण मुंबईत असताना त्यांना मोठ्ठे बंधू आजारी असल्याची बातमी समजली. आपला भाऊ आजारी असल्याचे समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट कराड गाठले. खासगी मोटारीने यशवंतराव कराडला पोहचले. वेळ होती दुपारी तीन वाजण्याची. त्याकाळी कराड स्टेशनच्या जवळ असणाऱ्या कल्याणी बिल्डींग येथे यशवंतराव चव्हाण यांचे मोठे भाऊ राहत होते. आजारी असणाऱ्या आपल्या भावाची यशवंतराव चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण कराड येथे मोठ्या बंधूंच्या घरी थांबले.
रात्री जेवण केल्यानंतर यशवंतराव चव्हाण बिल्डींगच्या गच्चीमध्ये उभे राहिले होते. आजूबाजूचा परिसर पाहत असताना त्याची नजर अंतरावर दूर असलेल्या रेल्वेच्या फाटकाकडे गेली. यावेळी त्यांना त्यांच्या दिशेने लाल सिग्नल पडलेला दिसला. तो सिग्नल पाहिल्यानंतर क्षणभर देखील वेळ न घालवता त्यांनी मध्यरात्री पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. घरामध्ये येऊन त्यांनी आपली बॅग भरुन कराड रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे स्टेशनवर पोहचल्यानंतर त्यांनी पुण्याला जाणारी गाडी पकडली.
यशवंतराव चव्हाण पुढे गेल्यानंतर पाठीमागे ते थांबलेल्या कराड येथील कल्याणी बिल्डींगमध्ये आठ दहा बंदूका घेतलेले, हातात कुऱ्हाड आणि काठ्या असणारे मारेकरी शिरले. मारेकऱ्यांनी घराची झाडाझडती घेतली. मात्र, त्यांना यशवंतराव आढळून आले नाही. नंतर त्या ठिकाणाहून मारेकऱ्यांनी पळ काढला. यशवंतराव चव्हाण थांबलेल्या घरावर मारेकऱ्यांनी हल्ला केला असून त्यांनी यशवंतरावांना पळवून नेल्याची अफवा संपुर्ण कराड शहरात पसरली. मात्र, तोपर्यंत इकडे यशवंतराव चव्हाण सुखरूप पुण्यात पोहचले होते. काही तासानंतर यशवंतराव चव्हाण पुण्याच्या इन्स्पेक्शन बंगल्यावर सुखरूप पोहचले असल्याची पुणे पोलिसांनी तार कराड पोलिसांना पाठवली.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून यशवंतरावांनी केला ‘तो’ निर्णय रद्द… (Yashwantrao Chavan)
शिक्षण सर्वदूर न्यायचे असेल, नवी पिढी घडवायची असेल तर नवी विद्यापीठे होणे आवश्यक आहेत, असे यशवंतराव चव्हाण यांना वाटत असे. परंतु त्या काळी एखाद्या भागात विद्यापीठाची मान्यता मिळण्यासाठी अनेक अटी घालण्यात आलेल्या होत्या. मुख्य म्हणजे त्या भागात काही संख्येने महाविद्यालये असणे आवश्यक होते. पण मराठवाड्यासारख्या भागात तेव्हा महाविद्यालयांची संख्या कमी होती. मराठवाड्यात तसेच राज्यात विद्यापीठांची संख्या वाढावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी पूर्वीचा असलेला निर्णय बदलला. त्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये विद्यापीठ स्थापन केले. ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. पुढे जाऊन यशवंतराव चव्हाण यांनी कोल्हापूरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन सुरु करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही विद्यापीठांमुळे या भागांमधील असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता आले.
यशवंतरावांनी जेव्हा वेणूताईंना लिहिले भावनिक पत्र
यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना एक भावनिक पत्र लिहिले होते.”सर्व संकटांना तू ध्यैर्याने तोंड दिलेस आणि माझी हिंमत वाढवलीस. त्यामुळे पुन्हा मी नव्या आशेने पुढे जाऊ शकलो. 1952 ते 1955 च्या कठीण राजकीय काळातही तू माझी खरी सोबती म्हणून साथ दिलीस. कठीण काळात माझ्या सल्लागाराचे व जिवाभावांच्या मित्राचे कार्य केलेस. तुझ्या निरागस सोबतीशिवाय मी निरर्थक व्यक्ती ठरण्याचा संभव आहे. माझ्या वाढत्या जबाबदारीबरोबर तुझी वाढती साथ नसेल तर माझे आयुष्य अर्थशून्य गोष्ट बनेल,” अशा भावना त्यांनी वेणूताईंबद्दल व्यक्त केल्या होत्या.
यशवंतरावांचे निर्णय दूरगामी परिणाम करणारे…
यशवंतराव चव्हाण यांचं पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. यशवंतरावांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक पदावर काम केले.तसेच नव्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिक्षणक्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले काही निर्णयही दूरगामी परिणाम करणारे ठरले.
‘हिमालयाच्या’ रक्षणाला ‘सह्याद्री’ धावून गेला…. (Yashwantrao Chavan)
1962 साली चीनने भारतावर अचानक आक्रमण केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात संकटांसह अडचणी उध्दभवल्या होत्या. अशात मुंबईत तत्कालीन सचिवलायातील मुख्यमंत्री दालनातील फोन खणखणला, पलीकडून नेहरू बोलले. नेहरूंनी यशवंतरावांना सांगितलं की “तुम्हाला दिल्लीला यायचं आहे संरक्षण मंत्री म्हणून. यशवंतरावांनी नेहमी प्रमाणे उत्तर दिले कि, ”वेणूताईंशी चर्चा करून सांगतो.” त्यानंतर यशवंतरावांनी वेणूताईंशी चर्चा केली आणि सन 21 नोव्हेंबर 1962 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्री पदाची शपथ घेतली. प्रचंड काम होतं, सैन्य दलाचा खच्ची झालेला आत्मविश्वास पुन्हा आणणे गरजेचे होते. पुढील चार वर्षे यशवंतरावांनी सैन्य दलावरील खर्च वाढवला,सैन्याला आधुनिक शस्त्र मिळवून दिली, प्रत्यक्ष सीमेस भेटी दिल्या,सैन्य दलातील बाह्य हस्तक्षेपास अटकाव केला.या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे 1965 च्या युद्धात भारतीय सैन्य लाहोर पर्यंत धडकले.
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्काराची अजितदादा गटाच्या नेत्याकडून मागणी…
देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदान लक्षात घेत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या मागणीची राज्य सरकारकडून दखल घेतली जाणार का? हे पाहावे लागेल.
…तेव्हा यशवंतरावांनी पवारांचे ऐकले असते तर पंतप्रधान झाले असते
चीनच्या युद्धाच्या नंतर तहाची बोलणी करण्यासाठी शास्त्रीजी ताश्कंदला गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला. त्यांच्यानंतर पंतप्रधान पद कोणाला मिळणार? याची चर्चा सुरु झाली. यावेळी अर्थमंत्री मोरारजी देसाई आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव मुख्यतः चर्चेत आले. एक दिवशी संध्याकाळी यशवंतरावांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, आबासाहेब कुलकर्णी, किसनराव वीर या नेत्यांनी भेट दिली. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना “पंतप्रधान पदासाठी तुम्ही तयार व्हा,” अशी मागणी केली होती, मात्र, त्यांच्या मागणीकडे यशवंतराव चव्हाण यांनी कळवतो असे सांगितले. एक दिवस शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण होते. तेव्हा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी, असे सांगितले. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी पवारांचे न ऐकता इंदिरा गांधी यांच्यासोबत चर्चा केली आणि नंतर इंदिरा गांधी यांनी शपथ घेणार असल्याचे यशवंतराव चव्हाण यांना सांगितले.
प्रितीसंगम आणि यशवंतराव… (Yashwantrao Chavan)
यशवंतराव बळवंतराव चव्हाण (१२ मार्च १९१३ – २५ नोव्हेंबर १९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे ५ वे उपपंतप्रधान होते. ते काँग्रेसचे खंबीर नेते, सहकारी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. ते सामान्य लोकांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते.त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर कराड येथील कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम झालेल्या प्रितीसंगम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
….आणि पंडित नेहरुंनी दिली कोयना प्रकल्पास भेट
१ मार्च १९५८ रोजी कोयना धरणाच्या कामास प्रारंभ झाला. दरम्यानच्या काळात पहिले व दूसरे महायुद्ध, तसेच जागतिक मंदीमुळे हे काम थांबले. राज्यातून विजेची वाढती मागणी होत असल्याने १९४५ साली पुन्हा सर्वेक्षण व नियोजनाचे काम सुरू झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोयना धरण विभागाची स्थापना करण्यात आली. १९५३ साली लोकनेते बाळासाहेब देसाई व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांनी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. १९ जानेवारी १९५४ रोजी मोरारजी देसाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपुजन झाले. त्यानंतर कामास सुरुवात झाली, कोयना प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली भेट दिली. प्रकल्पाचे काम पाहून ते प्रभावित झाले होते. त्यांनी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या श्रमिकांचे व अभियंत्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. पुढे १९६९ साली या धरणात पाणी साठविण्यास प्रारंभ झाला, तर १९६२ साली विद्युतनिर्मितीस सुरुवात झाली.