जत्रा रद्द : टाकेवाडी, पांगरी दोन्ही गावात प्रतिबंधात्मक आदेश लागू

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

टाकेवाडी (ता. माण) येथील श्री सतोबा व पांगरी (ता. माण) येथील श्री बिरोबा देवांच्या येत्या शनिवारी व रविवारी होणाऱ्या जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दोन्ही गावात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी यासंबंधी दोन्ही गावांत बैठका घेऊन गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी अद्याप शासनाने यात्रा- जत्रांवर निर्बंध घातले आहेत. श्री सतोबा व श्री बिरोबा जत्रांना राज्यातून दर वर्षी लाखो भाविक उपस्थिती लावतात. मात्र, मागील वर्षी जत्रा पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. या वर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्याचे पाहून लोकांत नियम पाळण्याबाबत शिथिलता आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर यांनी दोन्ही देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची, तसेच ग्रामस्थांची बैठक घेऊन शासनाच्या नियमांबद्दल मार्गदर्शन केले. बैठकीत जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस प्रकाश इंदलकर, पोलिस शिपाई रूपाली फडतरे, सतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादा दडस, उपाध्यक्ष बाबा दडस, सचिव शंकर दडस, खजिनदार रसवंत दडस, व्यवस्थापक शिवाजी ताटे, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम दडस, सदस्य शहाजीराव दडस, चंद्रकांत दडस, दादासाहेब दडस, दिनकर दडस, ज्योतिराम दडस, तात्याबा दडस, सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

You might also like