हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये हा शाही शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते, उद्योगपती, संत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि देशातील ६० प्रमुख उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आले आहे.
योगींच्या शपथविधी सोहळ्याला सर्व भाजपशासित मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. योगी यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीच्या लोकांसह 50 पेक्षा अधिक संतांना निमंत्रण दिले आहे. आठ हजार पोलीसश्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वरिष्ठ सदस्यांसह प्रमुख संतांना निमंत्रित करण्यात आले आहे.
विरोधी पक्षांनाही आमंत्रण-
या भव्य शपथविधी ला विरोधी पक्षांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रीत केले जाणार आहे.
योगींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश??
योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ जवळपास निश्चित झाले आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काही नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगींच्या मंत्रिमंडळात अनेक महिला मंत्री असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक तरुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळू शकतात. महेंद्र सिंह, असीम अरुण, राजेश्वर सिंह आणि स्वतंत्र देव सिंह यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.