हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेती करणे परवडत नाही असं म्हणणाऱ्यांना एका युवा उच्चशिक्षित तरुणाने चांगलीच चपराक लावली आहे. शेतीत योग्य नियोजन केल्यास त्यातूनही लाखोचा फायदा होऊ शकतो हे नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणानं सिद्ध करुन दाखवलं आहे. अविनाश पाटील असं या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे.
गुजरात राज्यात एका बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची वाट धरलेल्या अविनाश पाटलांनी शेतीची ताकद दाखवून दिली आहे. अविनाश पाटील यांनी सहा एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करून पाचशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेतले आहे त्यांना अजून मार्च महिन्यापर्यंत 500 क्विंटल उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे.
अविनाश पाटील हे गुजरातमधील सुरत येथे कोटक महिंद्रामध्ये कामाला होते. उच्च शिक्षण घेतलेल्या अविनाश यांचे कोटक महिंद्राच्या नोकरीत मन रमलं नाही अखेर त्यांनी गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. नंदुरबार जिल्ह्यात केळी आणि पपई या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. दोन्ही पारंपारिक पिकांना पर्याय देत अविनाश यांनी मिरची लागवड करण्याच निर्णय घेतला. अविनाश पाटील यांनी 18 ऑगस्टला सहा एकरावर मिरची लागवड केली.
अविनाश पाटील यांनी त्यांच्या शेतामधील सहा एकरांवरील मिरची लागवडीसाठी 4.50 लाख रुपये खर्च केले आहेत. ५०० क्विंटल मिरची विक्रीतून त्यांना आतापर्यंत 12 लाखाचे उत्पन्न आले आहे. अविनाश पाटील यांनी याविषयी बोलताना शेतातील मिरचीचा तोडा मार्च महिन्यापर्यंत चालणार असल्याचं सांगितलंय. येत्या दोन महिन्यात ५०० क्विंटल मिरचीचं उत्पादन होईल असा त्यांना अंदाज आहे. संपूर्ण मिरची विक्री झाल्यानंतर एकूण खर्च जाऊन २० लाख रुपयांचा नफा होईल, अशी अपेक्षा असल्याचं अविनाश पाटील यांनी सांगतिलय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’