पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको म्हणत युवा शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. सूरज जाधव असे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून विशेष म्हणजे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केलाय या व्हिडीओमध्ये तो विषारी औषध घेताना दिसून येत आहे.

या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतो की, पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी म्हणून मिळू नये. माझं आयुष्य इतकच होतं. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीय, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो,” असं सूरज या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. सूरजने या व्हिडीओमध्ये कीटकनाशकाची बाटली दाताने उघडली आणि तोंडाला लावली. त्यापूर्वी त्याने सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाहीय असंही म्हटलं. या प्रकारानंतर सूरजला पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सूरजचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतक-याच्या बच्छड्यानो इतके टोकाच पाऊल उचलू नका , या नादान राज्यकर्त्यांच्या नरडीचा घोट घेऊ पण आपले आयुष्य संपवू नका. पंढरपूर येथील मगरवाडी तालुक्यातील सूरज जाधव या शेतकरीपुत्राने स्वतःची चित्रफित बनवत सरकारला जाब विचारून आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना एक दाण्याचे हजार दाणे करणा-या माझ्या शेतक-यावर येत आहे. शेतक-याची पोर किडा मुंगीसारखी मरत आहेत तुम्ही मात्र कोडगेपणाने फक्त पाहत राहता.हिच पोरं एक दिवस तुम्हाला रस्त्यावर नागडं करून पायाखाली तूडवून मारतील तो दिवस फार लांब नाही”, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर जोरदार टीका केलीय.

Leave a Comment